श्रीवर्धन: शेतीच्या आधुनिकीकरणासाठी व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू केलेली ॲग्रीस्टॅक योजना श्रीवर्धन तालुक्यात रखडल्याचे समोर आले आहे.या योजनेत शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून त्यांना थेट विविध कृषी योजनांशी जोडले जाणार आहे.मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत इंटरनेट सेवा,कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक मर्यादा या मोठ्या अडचणी ठरत आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करून ‘शेतकरी ओळखपत्र’ म्हणजेच फार्मर आयडी प्राप्त करणे बंधनकारक आहे. पुढील काळात कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाने तालुक्यात विविध कॅम्पचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ अ उतारा आणि आधार क्रमांक भ्रमणध्वनीशी लिंक असणे आवश्यक असल्याची माहिती शासकीय कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.प्रक्रियेअंतर्गत कर्मचारी घरोघरी भेट देत लॅपटॉप व इंटरनेटच्या सहाय्याने नोंदणी करीत आहेत. मोबाईल क्रमांक लिंक असल्यास ओटीपी च्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. मात्र श्रीवर्धन तालुक्यातील वास्तव वेगळेच आहे.
अनेक गावांमध्ये इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडत नाही. डोंगराळ व दुर्गम भागांमध्ये तर इंटरनेटचा पत्ता नसतो. त्यामुळे कॅम्पस भरूनही नोंदणी अपूर्ण राहत आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी जोडलेले नाहीत, तर काहींचे आधार कार्ड अद्याप नूतनीकरण झालेले नाही. परिणामी, ओटीपी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नोंदणी अडकून पडत आहे.या अडचणींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही ॲग्रीस्टॅकच्या कक्षेबाहेर आहेत.
पायाभूत सुविधेकडे लक्ष देणे गरजेचे.
योजना चांगली असली तरी तिच्या अंमलबजावणीतली प्राथमिक पायाभूत सोय मजबूत केली पाहिजे.इंटरनेट सेवा खंडित होणार असेल तर दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचणे अशक्य आहे. शासनाने सर्वप्रथम नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देणे, आधार नूतनीकरणाची सोय गावपातळीवर करणे आणि जनजागृती मोहीम वाढवणे आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.एकूणच ॲग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट व वेळेत शासकीय योजना मिळतील, ही अपेक्षा आहे. परंतु श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता ही योजना अद्याप सुरळीत कार्यान्वित झालेली नाही.शासनाने तातडीने उपाययोजना केल्यास या महत्त्वाकांक्षी योजनेचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल, असे श्रीवर्धन मधील शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे.
योजनेचे फायदे :
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो आणि त्यांना पीक विमा, पीक कर्ज, आणि इतर अनुदाने थेट त्यांच्या बँक खात्यात मिळण्यास मदत होते. ही प्रणाली शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि समृद्ध बनवते, ज्यामुळे शेती क्षेत्रातील डिजिटल क्रांतीला चालना मिळते.
श्रीवर्धन तालुक्यात ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत ८९०७ ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेले आहेत.कॅम्प माध्यमातून नोंदणी वाढवण्यात येत आहे.- श्रद्धा किरण डुंबरे,तालुका कृषी अधिकारी.