अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली. जलसंपदाचा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि बँकेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी त्यास पाठिंबा दिला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

जिल्हा बँकेची ६८ वी वार्षिक सभा आज, गुरुवारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती शिंदे, मंत्री विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह संचालक उपस्थित होते. या वेळी बँकेच्या क्यूआर कोड प्रणालीचे उद्घाटन शिंदे व विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जाणता राजा असा उल्लेख करून टीका सुरू करताच उपस्थित सभासदांनी कर्जमाफ करा अशी मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावर मंत्री यांनी बँकेने ठराव घ्यावा, आपण शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन देतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदानही देऊ असे सांगितले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सध्याच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कितीही मदत दिली तरी समाधान होणारे नाही, कर्जमाफी महत्त्वाची आहे, असे सांगत मागणीस पाठिंबा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस बँकेने १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सभापती शिंदे यांनी, अतिवृष्टीने नुकसान झाल्याच्या काळात सरकारला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका बजवावी लागणार आहे. कर्जमाफीशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. ते आपले ऐकतील, असे आश्वासन दिले.

पवारांनी जिल्ह्यात ढवळाढवळ करू नये- राधाकृष्ण विखे

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अहमदनगर जिल्हा बँकेबद्दल मला चिंता वाटते, असे वक्तव्य केले. त्याचा संदर्भ देऊन विखे म्हणाले, जाणता राजांनी आता बँकेची चिंता करण्याऐवजी स्वतःची चिंता करावी. जिल्ह्याची चिंता करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, बाहेरच्या लोकांची गरज नाही. बाहेरच्या लोकांनी जिल्ह्यात ढवळाढवळ करू नये, असा हल्लाबोल विखे यांनी चढवला.

६३.७२ कोटींचा नफा

जिल्हा बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देताना अध्यक्ष कर्डिले यांनी सांगितले, बँकेस ६३ कोटी १० लाखांचा नफा झाला. संचालक मंडळाने भागधारकांना १० टक्क्यांप्रमाणे लाभांश देण्यासाठी ३६ कोटी ७२ लाख रुपये वितरित करण्याची शिफारस केली आहे. बँकेचे ठेवी ९५८८ कोटी रुपये आहेत, ६८५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. बँकेची ३० जून अखेरची वसुली ५१.४३ टक्के झाली आहे.