अहिल्यानगर : चीजसदृश बनावट अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी येथील अन्न व औषध प्रशासनाने नामांकित उत्पादन कंपनीला नोटीस बजावली आहे. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी ही माहिती दिली. सहायक आयुक्त (अन्न) एस. एच. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी बडे व नमुना सहायक सागर शेवंते व शुभम भस्मे यांनी केली.

या संदर्भात माहिती देताना अन्नसुरक्षा अधिकारी बडे यांनी सांगितले, की शहरातील नवी पेठ येथील मे. गुप्ता फुड्स या दुकानातून अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी करून क्रिमी चीज (फूड क्राफ्ट) या अन्नपदार्थाचा नमुना घेतला होता. हे अन्नपदार्थ चीज नसून, खाद्यतेलापासून निर्माण केलेला चीजसदृश पदार्थ असल्याचे पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवालातून निष्पन्न झाले. हा अन्नपदार्थ डेल मोंटे या कंपनीमार्फत उत्पादित केल्याचे आढळले आहे. याबाबत उत्पादक कंपनीस नोटीस काढण्यात आलेली आहे.

शहरातील अनेक अन्नपदार्थविक्रेते विशेषत: पिझ्झा, चाट सेंटर हे क्रीमी चीज (फूड क्राफ्ट) या बनावट चीजसदृश अन्नपदार्थाचा वापर पिझ्झा, बर्गरसाठी करत असल्याचे आढळले आहे. अशा प्रकारचे बनावट चीजसदृश पदार्थ पिझ्झा, बर्गर तयार करण्यासाठी वापरून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे आढळले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार उत्पादक कंपनीविरुद्ध कारवाईसाठी पुढील तपास बडे करत आहेत.

महिन्यापूर्वी शहराच्या बोल्हेगाव उपनगरातील ग्राहकाने सावेडी उपनगरातील एका मॉलमधून खरेदी केलेल्या मॅगीच्या पाकिटामध्ये पालीचे मेलेले पिलू आढळले होते. या ग्राहकाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर याचा तपास केंद्रीय परवाना प्राधिकरणाकडे सुपुत्र करण्यात आला होता. मॅगीउत्पादक कंपनीला देशभरातील उत्पादनासाठी केंद्रीय पातळीवरून परवाना वितरित करण्यात आला आहे. त्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बनावट चीजचा नमुना सादर करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आपल्या खाद्यपदार्थांत वापरले गेलेले चीज हे खाण्यासाठी योग्य आहे की बनावट, अखाद्य आहे याबद्दल ग्राहकांच्या मनात साशंकता निर्माण झालेली आहे. वापरलेले चीज खाद्य की अखाद्य हे ओळखण्यासाठी ग्राहकांकडे मोजमाप उपलब्ध नसते. त्यामुळे बनावट चीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.