अहिल्यानगर : चार सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दाम्पत्याने सहा महिन्यांपूर्वी एका तरुणाचाही खून करून मृतदेह परस्पर पुरून टाकल्याची खळबळजनक घटना राहुरी पोलिसांच्या तपासात उघडकीस आली. पुरलेला हा मृतदेह कार्यकारी दंडाधिकारी व पंचांसमक्ष पोलिसांनी खोदून काढला. तपासी अधिकारी तथा राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, अटक केलेल्या आरोपी दांपत्याला न्यायालयाने उद्या, बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश पूर्वीच दिलेला आहे.

आई-वडील विभक्त झाल्याने नाशिक जिल्ह्यातील चार बहिणी सांभाळ करण्यासाठी राहुरीतील दूरच्या नातलग दाम्पत्याकडे ठेवण्यात आल्या होत्या. यातील तीन बहिणी अल्पवयीन तर एक बहीण सज्ञान आहे. या चौघींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना स्नेहालय या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली. त्याची दखल घेत पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी मुलींची सुटका केली व दाम्पत्याला अटक केली होती.

या घटनेतील तिसऱ्या आरोपीबाबतसंदर्भात चौकशी करताना पोलिसांना या दाम्पत्याने त्या आरोपीच्या खुनाची कबुली दिली. त्याचा मार्च २०२५ मध्ये त्याचा सकाळी घरातच गळा दाबून खून केला व मृतदेह रात्रीपर्यंत तसाच घरात ठेवून घरामागे पत्नीच्या मदतीने पुरल्याची कबुली आरोपीने दिली. हा आरोपी आई-वडील नसल्याने तो आरोपी कुटुंबासोबतच राहत होता. पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी संध्या दळवी व पंचांसमक्ष आज, मंगळवारी दुपारी देवळाली पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. दवणगाव ग्रामस्थांच्या मदतीने तो गाडेकर याचाच असल्याची खात्री करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायतीमार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या दाम्पत्याविरुद्ध आता खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पैशाच्या मोबदल्यात विवाह

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आणखी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या चार बहिणींपैकी एका १४ वर्षीय मुलीचे ५० वर्षे व्यक्तीसोबत पाच वर्षांपूर्वीच एक लाख रुपये घेऊन या दांपत्याने विवाह लावून दिल्याचे व नंतर तीन महिन्यांनी पुन्हा तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय दुसऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यासाठी एकाकडून ३ लाख रुपये या दाम्पत्याने घेतल्याची माहिती मिळाल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले.