अहिल्यानगर: राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याचा आदेश शुक्रवारी काढण्यात आला आहे. या संदर्भात गृहमंत्रालयाचे सहसचिव राजेश होळकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे आहे. अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२४ रोजी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती.
तत्कालीन आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतराची मागणी केली होती. तत्कालीन विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनात नामांतराची मागणी मान्य करत अहमदनगर महापालिकेकडे नामांतराचा ठराव करण्याची सूचना पाठवली होती. मात्र त्यावेळी महापालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना नामांतराचा ठराव घेण्यात आला नाही. सभागृहाचे अस्तित्व संपून प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर प्रशासकीय महासभेत नामांतराचा ठराव करण्यात आला. त्यानंतर महसूल व वन विभागाने अहमदनगर शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची अधिसूचना ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केली होती.
राज्य सरकारने नाव बदलले असले तरी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांची नावे मात्र त्यानंतरही अहमदनगरच राहिलेले आहे. आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वेस्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने रेल्वेस्थानकाचे नामांतर केल्याची अधिसूचना जारी केली आहे. अहमदनगर शहराची स्थापना १४९० मध्ये अहमद निजामशहाने केली. त्यानंतर या शहरावर निजाम, मुघल, ब्रिटिश, पेशवे, होळकर अशा विविध राजवटी अस्तित्वात होत्या.
मध्यंतरी काळात शहरातील रहिवासी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अर्षद शेख आदींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नामांतराला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाशिक विभागीय आयुक्त व अहमदनगर महापालिकेचे आयुक्त यांना नोटीसाही बजावल्या आहेत. मात्र नंतरच्या कालावधीत या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित राहिली. ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नामांतर केल्याने हा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दाही झाला होता. त्याचबरोबर भाजपअंतर्गत राधाकृष्ण विखे व राम शिंदे यांच्यामध्ये गटबाजीच्या वादाचा मुद्दाही रंगला होता.
निवडणुकीत त्यावरून महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाईही रंगली होती. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी जाहीर सभेत केली होती. मात्र शिवसेनेने या मागणीचा पाठपुरावा नंतर केला नाही. यानंतर पुढील काळात अहिल्यानगर नामांतराची मागणी पुढे आली आणि ती मान्य झाली.