Ajit Pawar Visits Flood Affected Villages in Dharashiv Marathwada : सोलापूरसह मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यातील नदी, नाले, ओढे आणि धरणं तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला असून कित्येक गावं पाण्याखाली गेली आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूरग्रस्त नागरिक सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. अजित पवार यांनी आज पहाटे धाराशिवमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी अजित पवार ग्रामस्थांशी संवाद साधत असताना एका गावकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली. यावेळी अजित पवार त्याच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं.

“अरे बाबा मी सुद्धा सकाळी सहा वाजता पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. सकाळी सहा वाजता मी करमाळ्यात होतो. जो काम करतो त्याचीच **. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का?” अशा शब्दांत अजित पवारांनी या ग्रामस्थाची कानउघडणी केली.

अजित पवार ग्रामस्थांना सांगत होते की “आम्हाला कल्पना आहे याआधी कधीच झाला नाही असा पाऊस मराठवाड्यात झाला आहे. आपल्या स्वप्नातही कधी जितकं पाणी इथल्या धरणांमध्ये साठलं नसेल तितकं पाणी आता दिसतंय. हे मोठं नैसर्गिक संकट आहे. परंतु, आपण सगळे मिळून धीराने या संकटाचा सामना करुया. आम्ही यात तुमच्याबरोबर आहेत.” याच वेळी उपस्थित ग्रामस्थांपैकी एकाने कर्जमाफीवरून प्रश्न उपस्थित केला. त्यावर अजित पवार संतापले.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय? सकाळी ६ वाजता मी पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केलाय. ६ वाजता मी करमाळ्यात होतो. जो काम करतो ना तुम्ही त्याचीच **. मी एवढा जीव तोडून सांगतोय तेही जरा ऐका. मला अजून एका ठिकाणी जायचं आहे. तुमच्या अडचणी आम्हाला कळत आहेत. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत करतोय माहितीय का? दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांची मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफ केली, त्याचे २० हजार कोटी भरतोय. आम्ही काय झोपा काढल्या नाहीत. लोकांनी रात्री-अपरात्री कधीही फोन केले, ते फोन उचलले, शक्य ती मदत पाठवली. एवढं करूनही कोणी असं बोललं की वाईट वाटतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, हा सगळा त्यातलाच प्रकार आहे. आम्ही इतकं जीवाचं रान करतोय आणि यांना काहीतरी तिसरंच काढायचं आहे.”

पैशाचं सोंग करता येत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री म्हणाले, “हे राज्य चालवत असताना लोकांचे उद्ध्वस्त झालेले संसार परत कसे उभे करता येतील, त्यांना मदत कशी करता येईल, लोकांच्या खरडून गेलेल्या जमिनी पूर्ववत कशा आणायच्या, लोकांची व्यवस्था कशी करायची, घरं परत कशी बांधून द्यायची, याचा आम्ही विचार केला आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी करू. बाबांनो, सगळी सोंगं करता येतात. पण पैशाचं सोंग करता येत नाही.”