मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आज (२५ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस हे माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. त्यांनी जरांगे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. ते आज (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपण काय बोलतोय हे…”

“मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागले आहे. प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय हे थोडे पाहिले पाहिजे. काहीजण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहेत. हे नक्की कोण करतंय. एवढं धाडस कसं होत आहे. याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे,” असे अजित पवार म्हणाले.

“मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेट घ्यायला गेले”

“याआधीही अनेकांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे प्रमुख एकदा जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, प्रश्न धसास जावा यासाठीचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेट घ्यायला गेले,” असे अजित पवार म्हणाले.

“काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये”

“याआधी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी फार बारकाईने काम केले जात आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय. असे असताना आजदेखील वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तव्यं केली जात आहे. मुख्यमंत्र्यांबाबत शिवराळ भाषा केली जाते. अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये. असं होणार नाही. शेवटी सर्वांना नियम आणि कायदे सारखे आहेत,” असा इशाराही अजित पवार यांनी मनोज जरांगेना दिला.

“गालबोट लावण्याचे प्रयत्न कोणी करू नये”

“कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपल्याकडे आरक्षण हे ७२ टक्के झालं आहे. त्यामुळे यावर बारकाईने काम होणं गरजेचं आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेवर साडे सहा लाख हरकती आलेल्या आहेत. त्यावर काम चालू आहे. शेवटी काम करताना मागणी कायद्याच्या चौकटीत कशी बसेल हे पाहणे महत्त्वाचे असते. याची नोंद सर्वांनी घ्यावी. सरकार चांगले काम करत आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न कोणी करू नये,” असे आवाहन अजित पवार यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on maratha reservation criticizes manoj jarange patil prd