Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे. मात्र निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे हे अजित पवार यांनी सांगितलं आहे. अजित पवार हे महायुतीत जुलै २०२३ ला सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा तिघांचं सरकार आहे. आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ( Ajit Pawar ) महत्त्वाचं विधान केलं आहे.

शरद पवारांवर नो कमेंट्स

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. त्यानंतर अजित पवार ( Ajit Pawar ) हे महायुतीबरोबर तर शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असतो. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले होते की, यासंदर्भातील निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील नेते एकत्र मिळून घेतील. आता अजित पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नो कमेंट्स इतकंच उत्तर दिलं आहे. तसंच अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी महायुतीची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री असेल हे देखील सांगितलं आहे.

हे पण वाचा- अजित पवार स्पष्टच बोलले, “होय गुलाबी जॅकेट आणि तो रंग निवडला कारण…”

मुख्यमंत्री कोण होणार विचारताच काय म्हणाले अजित पवार?

आगामी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होईल? हे विचारताच अजित पवार म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही सर्व आमदार एकत्र बसून ठरवणार आहोत. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे”, यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता आम्ही सगळे आमदार बसून निर्णय घेऊ, असं सांगितलं.

अजित पवार यांनी काय म्हटलं आहे गुलाबी रंगाबाबत?

अजित पवारांचं वक्तव्य चकित करणारं आहे, चर्चा सुरु

अजित पवारांचं हे वक्तव्य काहीसं चकित करणारं आहे. याचं कारण देवेंद्र फडणवीस हे कायमच सांगत असतात की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवू. तसंच अजित पवारही म्हणाले आहेत. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं आहे. याचाच अर्थ त्यांची एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती नाही हे स्पष्ट आहे. तसंच मागच्या एका मुलाखतीत त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही म्हटलं होतं. त्यादृष्टीने आता काही पावलं टाकली जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. अजित पवारांनी जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गुलाबी रंगाची थीमही निवडली आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचारही ते त्यांच्या पातळीवर जोरदार करत आहेत. या सगळ्याचा फायदा त्यांना होणार का? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.