Ajit Pawar life threatened : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसन्मान यात्र काढली असून यामाध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान आज धुळे येथे सभेला संबोधित करत असताना अजित पवार यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्त वार्ता विभागाने दिला असल्याचे सांगितले. नाशिकला येथे विमानतळावर उतरलो असतानाच पोलीस अधिकाऱ्यांनी मला मालेगावला जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे, असे सांगितले होते.

गुप्तचर विभागाने तुम्हाला धोका असल्याची सूचना दिली असून त्याबद्दल माध्यमातही बातम्या आल्या आहेत. त्यामुळेच चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे जिथे मोठ्या संख्येने महिला असतील, तिथे तुम्ही गर्दीत जाऊ नका. तसेच मालेगाव आणि धुळे याठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या लक्षात आणून दिले आहे, असे अजित पवार यांनी धुळे जिल्ह्यात घेतलेल्या सभेत सांगितले.

हे वाचा >> मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री व केंद्र सरकारला म्हणाले…

“पण माय माऊलींनो तुम्ही माझ्या हातावर बांधलेल्या राख्या जोपर्यंत माझ्या हातात आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या कुणाचीही आवश्यकता नाही. माझ्या बहि‍णींचे आशीर्वाद, राखीचे कवच आणि प्रेमाची गाठ हे मला कोणताही धोका होऊ देणार नाही, असे माझे अंतर्मन सांगत आहे”, असेही अजित पवार धुळे येथील सभेदरम्यान म्हणाले.

अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ

अजित पवार यांना सातत्याने धमक्या येत आहेत. मात्र ते पोकळ धमक्यांना न घाबरता त्यांचा दौरा सुरूच ठेवणार आहेत. आमची जनसन्मान यात्रा सुरूच राहणार असल्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी धुळे येथे माध्यमांना माहिती देताना सांगितले. तसेच गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.