Ajit Pawar on Sharad Pawar Maharashtra Political News : पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) कार्यालयात वेगवेगळ्या पक्षांमधील नेते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश केला. जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर, मारुती किंडरे, स्वाती चिटणीस, रोहन सुरवशे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत दाखल झाल्या आहेत. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अजित पवार यांनी काका-पुतण्याच्या नात्यावर भाष्य केलं. तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्वाबाबत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आठवण काढली.

अजित पवार म्हणाले, “तुम्हाला कळतंय का मागचा अजित आणि आताच्या अजितमध्ये बराच फरक आहे. काळानुरूप वय वाढतं आणि वय वाढलं की परिपक्वता येते. पूर्वी आपण काहीही केलं तरी त्यावर पांघरुण घालायला साहेब (शरद पवार) असायचे. आता आपल्यालाच पांघरुण घालावं लागतं. गमतीचा भाग जाऊ द्या तुम्ही परिस्थिती समजून घ्या.”

उपमुख्यमंत्री म्हणाले, “मागे मी असंच एका ठिकाणी बोलता बोलता म्हणालो की आपल्याला दिल्लीत जाऊन कोणाला विचारून काही करावं लागत नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की काँग्रेसमध्ये, भाजपात किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिल्लीत असल्यामुळे त्यांना तिकडं जावं लागतं असं मी म्हणालो. परंतु, पत्रकारांनी वेगळाच अर्थ काढला. आम्ही इथं राहतो, मुंबईत, पुण्यात, बारामतीत असतो त्यामुळे आम्हाला दिल्लीला जायची गरज नाही, आम्ही इथे बसून आमचे निर्णय घेतो असं माझं म्हणणं होतं.”

चुलता पुतण्याचं मला काही सांगू नका : उपमुख्यमंत्री

“चुलता-पुतण्याचं मला सांगू नका, मागच्या पिढीचं (शरद पवार) काही सांगू नका, आताच्या पिढीचं काही सांगू नका आणि पुढच्या पिढीचं (रोहित पवार) देखील मला काही सांगू नका. शिरूरमध्ये तर माझी भावकीच मला सोडून गेली. तो (माजी आमदार अशोक पवार) पालकमंत्री व्हायची स्वप्न बघत होता. मी त्याला म्हटलं आता तू मला सोडून गेलायस, आता मी तुला निवडणुकीत पाडणार. तू कसा निवडून येतो तेच बघतो.

अजित पवार यावेळी पक्षातील नव्या सहकाऱ्यांना म्हणाले, “आपल्या पक्षाची विचारधारा समाजकल्याणावर आधारित असून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.” पुण्यात सुरू असलेली मेट्रो लाईन व रेल्वे लाईनची कामं लवकरच मार्गी लागतील. या सुविधांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षात तरुण कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, कारण याच माध्यमातून योग्य कार्यकर्ते, योग्य पदाधिकारी घडतात आणि योग्य नेतृत्व घडतं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.