फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. गोरेगावमधल्या चित्रपटसृष्टीचं रुप आम्ही येत्या चार वर्षांत बदलणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.तसंच अनिल कपूर यांच्या भेटीचा किस्साही सांगितला. एवढंच नाही तर मोदींना विचारलेला प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.

अक्षय कुमार काय म्हणाला?

अक्षय कुमार म्हणाला फिक्कीच्या २५ वर्षांच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मला त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आहे. याआधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्यांच्यानंतर आता मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतो आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता? त्याची खिल्ली उडवण्यात आली. पण मी काही सुधारणार नाही. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. तुम्हाला संत्री आवडतात का? असा पहिलाच प्रश्न अक्षयने विचारला ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आणि संत्रं खाण्याची नवी पद्धतही सांगितली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

होय, मला संत्री खूप आवडतात. ज्यावर अक्षय म्हणाला आता मला सांगा संत्री खाण्याची योग्य पद्धत काय? तुम्ही संत्री कशी खाता? सोलून खाता की की त्याचा रस तुम्हाला आवडतो? यावर फडणवीस म्हणाले, “मी तुम्हाला आज एक नवी पद्धत सांगतो. संत्रं जसं आहे तसं कापा, त्यावर थोडं मीठ टाकायचं. त्याचं साल खायचं नाही पण जशी आपण आपण आंब्याची फोड खातो तसं संत्रं खा एक वेगळी मजा तुम्हाला येईल. नागपूरच्या ओजी लोकांनाच संत्रं कसं खायचं माहीत आहे.” अक्षय कुमारने यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे संत्री खाण्याची नवी पद्धत शिकवल्याबद्दल आभार मानले. तसंच पुढे तो म्हणाला की असा कुठला चित्रपट किंवा अभिनेता आहे का? ज्याचा तुमच्यावर प्रभाव आहे. त्यावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं.

अनेक चित्रपट मला आवडतात. शिवाय नायक सिनेमाचा किस्सा सांगतो, तो चित्रपट आल्याने मला अडचणी वाढल्या. कारण मी जिथे जातो तिथे मला लोक म्हणतात नायकसारखं काम का करत नाही? अनिल कपूर भेटले मी त्यांना म्हटलं की नायक का केलात? लोक तुम्हाला नायक आणि आम्हाला नालायक समजतात. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.