सांगली : जून महिन्यातच कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहचल्याने सांगली जलसंपदा विभागाचे ३२ अधिकारी अलमट्टीसह हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी पावसाळी हंगाम संपेपर्यंत जलसाठ्यावर नजर ठेवणार आहेत.

कृष्णा नदीवर कर्नाटकात बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणातील जलसाठ्यामुळे सांगली, कोेल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याला फूगवटा येत असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पूरहानी होते असा आक्षेप घेतला जात आहे. महापुराच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील वारणा व कृष्णा नदीकाठच्या १०४ गावांना हानी पोहचते. तसेच सांगलीलाही मोठा फटका बसतो. यंदाच्या हंगामात मान्सूनपूर्व मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि पश्चिम घाटात संततधार असल्याने नदीतील पाण्याची पातळी जूनमध्येच वाढती आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा पाण्याची आवक जास्त असल्याने बुधवारी सकाळपर्यंत अलमट्टी धरणात पाणीसाठा ७६.५९ टीएमसी म्हणजेच ६२ टक्के पाणीसाठा झाला असून, महत्तम जलसाठा संचय पातळी ५१९.६० मीटर असताना आजची पातळी ५१६.३३ मीटर आहे. धरणातील पाण्याची आवक ७० हजार ४३५ क्युसेक असून, विसर्गही तेवढाच आहे.

अद्याप मान्सूनचे हंगामाचे तीन महिने शिल्लक असल्याने जलसाठा अधिक असल्याने सांगली, कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पूरनियंत्रण करण्यासाठी उभय राज्यामध्ये समन्वय असला तरी अलमट्टी, हिप्परगी येथील पाण्याची आवक, विसर्ग यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी १६ असे ३२ अधिकारी जलसंपदा विभागाने तैनात केले आहेत. हे अधिकारी प्रत्येक तासाला अलमट्टी, हिंप्परगी बॅरेजवरील स्थितीची माहिती सांगलीत पूर नियंत्रण कक्षाला कळवणार आहेत.