सावंतवाडी : ​पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथे येत्या २१, २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य ‘बायोडायव्हर्सिटी मीट’ म्हणजेच ‘जैवविविधता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

​गेली २० वर्षे निसर्ग संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ‘मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली’आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवसीय मेळावा होत आहे. या मेळाव्यात देशभरातील अनेक नामवंत वक्ते, संशोधक आणि निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत.

​विविध विषयांवरील तज्ञांचे मार्गदर्शन

मेळाव्यात निसर्गाच्या विविध पैलूंवर तज्ञ मार्गदर्शन करतील. यामध्ये सरपटणारे प्राणी व त्यांचे विश्व यावर केदार भिडे, उभयचर प्राणी यावर के. व्ही. गुरुराज (बेंगलोर), वन्यजीव व वन अपराध या विषयावर रोहन भाटे, पक्षी व त्यांचे जीवन यावर पराग रांगणेकर (गोवा), बुरशी (फंगी) या विषयावर शीतल देसाई, वन्यप्राणी यावर गिरीश पंजाबी, वनसंवर्धन आणि वनांविषयीचे इतर प्रश्न यावर भाई केरकर (गोवा), फुलपाखरू व पतंग यावर हेमंत ओगले व मिलिंद भाकरे, वनस्पती तज्ञ मिलिंद पाटील, आणि वटवाघूळ तज्ञ राहुल प्रभू खानोलकर यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, निसर्गातील घडामोडी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून प्रभावीपणे मांडण्यासाठीचे पर्याय यावर रमण कुलकर्णी बोलतील.

​उपक्रमांची रेलचेल

या जैवविविधता मेळाव्यात तज्ञांची व्याख्याने, जंगल भ्रमंती (ट्रॅकिंग) आणि इतर माहितीपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच, निसर्ग पर्यटक आणि अभ्यासकांसाठी रात्रीच्या वेळी सिंधुदुर्गाची लोककला असलेले दशावतार नाटक यासारखे सांस्कृतिक सादरीकरणही ठेवण्यात आले आहे. स्थानिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ​संस्थेच्या वतीने, ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​नोंदणीसाठी संपर्क:

  • ​काका भिसे, आंबोली: 7588447161
  • ​राजेश देऊळकर: 097655 75690
  • ​ई-मेल: mnccamboli2016@gmail.com यावर संपर्क साधावा.