रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची शेण खाण्याची…” | Loksatta

रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची शेण खाण्याची…”

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका केली आहे.

रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची शेण खाण्याची…”
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे प्रवक्त सुधांशू त्रिवेदी, मंगप्रभात लोढा आणि आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, आता भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा – “मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त

दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडी करून राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमोल मिटकरींची दानवेंवर टीका

दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या या व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रावसाहेब दानवे आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आता परत एकदा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करत भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली असल्याचा आणखी एक पुरावा आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तत्पूर्वी, मुंबईत पार पडलेल्या कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं म्हटलं होतं. प्रसाद लाड यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 21:28 IST
Next Story
‘खोके, खंजीर, धोका एवढंच त्यांना बोलता येतं’; श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा