राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विशेषत: अनिल देशमुख आणि अनिल परब विरोधकांच्या निशाण्यावर आलेले असतानाच अनिल देशमुख यांनी देखील परिवहन मंत्री अनिल परब यांचं नाव घेतल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, या आरोपांवर अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी गृहविभागाकडून एक समिती नेमण्यात येते. या समितीमध्ये परमबीर सिंग देखील होते. या विभागाकडे बदल्यांसंदर्भातील याद्या दिल्या जातात. या याद्या गृह मंत्रालयाकडून येत होत्या. पण त्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून देखील येत होत्या, असं परमबीर सिंग यांनी ईडीला सांगितलं आहे. यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारला परखड सवाल करायला सुरुवात केली आहे.

“तपास यंत्रणांसमोर आमचा खुलासा करू”

या सर्व प्रकरणावर बोलाताना अनिल परब यांनी चौकशीवेळी खुलासा करण्यासाठी आपण तयार असल्याचं नमूद केलं आहे. “या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, त्यांच्यासमोर आम्ही आमचा खुलासा करू”, असं अनिल परब म्हणाले आहेत.

“बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?”

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवरही आरोप

सिंग यांनी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबानुसार, सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद महत्त्वाचे गुन्हे तपासाला देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचे पुढे वाझे याने सांगितले होते, असा धक्कादायक आरोप सिंग यांनी आपल्या जबाबात केला आहे. वाझे हा त्याच्याकडील तपासाधीन गुन्ह्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांना देत होता. पुढे वरिष्ठांकडून ती माहिती मला दिली जायची किंवा वाझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊन माहिती देत होते. काही वेळा वाझे याने थेट येऊन माहितीसुद्धा दिली आहे. तसेच वाझे हा थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना त्याच्याकडील गुन्ह्यांची माहिती देत होता. तसेच तेसुद्धा त्याला बोलावून घेऊन पुढील तपासाबाबत सूचना देत होते. अनिल देशमुख हे वाझेसाठी नंबर १ होते, असा दावासुद्धा सिंग यांनी जबाबात केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab reacts on parambir singh anil deshmukh allegations on police transfers pmw