राजापूर – गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामध्ये कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणूस्कूरा घाटात मंगळवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यामध्ये पडलेली दरड हटविली. त्यामुळे घाट मार्गातील ठप्प झालेली वाहतूक सुमारे दोन तासानंतर पुन्हा एकदा पूर्ववतपणे सुरू झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राजापुर तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. आंबा घाटातही सोमवारी दरड कोसळल्याने साखरपा मार्गे जाण्याऐवजी अनेक वाहन चालकांकडून अनुस्कुरा घाट मार्गे जाण्याला अधिक पसंती होती. त्यामुळे घाटातून वाहतूक वाढली होती. अशातच पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात मंगळवारी सकाळी मोठे दगड आणि सोबत माती कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे घाटमार्गातून सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली होती.

घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपयोजना हाती घेतल्या. त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यामध्ये कोसळली दगड आणि माती बाजूला करण्यात बांधकाम विभागाला यश येऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. त्यामुळे सुमारे दोन तासानंतर या घाट मार्गातून वाहतूक पूर्ववतपणे सुरू झाली. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने वाहन चालकांनी घाटातुन वाहन चालविताना दक्षता घ्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.