Ashish Shelar Speech at Assembly Council : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात दोघे भाऊ एकत्र आले. यावरून सत्ताधारी नेते सातत्याने ठाकरे बंधूंवर टीका करत आहेत. सत्तेसाठी दोघेही एकत्र आल्याची वक्तव्ये करत आहेत. अशातच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी थेट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात बोलत असताना ठाकरे बंधूंना चिमटा काढला आहे.

आशिष शेलार यांनी चित्रपटाच्या नावावरून ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. “परिस्थितीच्या माऱ्याने दोघे एकत्र आले आहेत. त्यामुळे ‘आता कसा झेंडा घेऊ हाती?’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘येक नंबर’ चित्रपटाचा खर्च सात कोटी रुपये होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांनी सपशेल नाकारला”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला.

“परिस्थितीच्या माऱ्याने दोघे एकत्र आले”

सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणाले, “राजकारणात दोन पक्ष वेगळे झाले आणि त्यावर चित्रपट आला. कोणता झेंडा घेऊ असं विचारत ‘झेंडा’ नावाने चित्रपट प्रदर्शित झाला. आताचा भाग मात्र वेगळा आहे. परिस्थितीच्या माऱ्याने दोघे एकत्र आले आहेत. मात्र, आता चित्रपटाचं नाव काय होईल? ‘कसा झेंडा घेऊ हाती?’ असा सिनेमा आगामी काळात येऊ शकतो.”

“अलीकडेच एक सिनेमा येऊन गेला. त्याचं नाव होतं, ‘येक नंबर’ कोणाचा चित्रपट होता ते मला माहित नाही. मात्र त्या चित्रपटावर सात कोटी रुपयांचा खर्च झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ अडीच कोटी रुपयांची कमाई केली. लोकांनी हा चित्रपट नाकारल्याचं दिसलं. मला इथे राजकीय नेता किंवा इतर कुठल्या गोष्टीवर भाष्य करायचं नाही. मात्र, राजकीय नेत्याचं आयुष्य किंवा पात्रातला राजकीय नेता, चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा समाजावर काय प्रभाव पडतो याचं एक रसिक म्हणून मी विश्लेषण मांडलं आहे. मला ‘येक नंबर’ चित्रपटावर टीका करायची नाही. तसेच जो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला त्याचं गुणगानही गायचं नाही. मी केवळ विश्लेषण मांडलं.”

चित्रपट धोरण तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे : शेलार

आशिष शेलार म्हणाले, “सिनेमे हे राजकारणासंबंधित लोकांचा समज वाढाविण्यासाठी असावेत, राजकीय घडामोडींचे आकलन व्हावे यासाठी असावेत, त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी असावेत. विशेषतः तरुणांमध्ये राजकारणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी असावेत. केवळ रंजकतेसाठी, व्यवसायिक यश पाहून, कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी राजकीय नेत्यांचे नकारात्मक चित्रण चित्रपटात टाळले जावे. म्हणून या सगळ्यावर बैठक घेण्यात येईल. चित्रपट धोरण तयार करण्याची प्रक्रिया चालू असून सिनेमा आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही यामध्ये सामावून घेतलं आहे. त्यावेळी या सर्व बाबींचा आपण विचार करु.”