नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली असून १९९७ सालच्या स्थापनेनंतर या संस्थेने प्रथमच प्रदीर्घ काळ प्रशासकीय राजवट अनुभवली आहे. निवडणुकीनंतर मनपातील राजकीय चित्र कसे असेल, याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असून या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणातील दोन चव्हाणांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे !

राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण आणि नांदेड लोकसभेचे खासदार प्रा.रवीन्द्र चव्हाण हे दोघे गेल्या बुधवारी दिल्लीहून एकाच विमानामधून नांदेडला आले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे समजते. बोलता बोलता रवीन्द्र चव्हाण यांनी नांदेड मनपात आधीची म्हणजे काँग्रेसची सत्तेची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले.

खा.अशोक चव्हाण यांनी मनपाच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसचे नेतृत्व करताना आपला प्रभाव दाखवून दिला. १९९७ ते २०२२ या २५ वर्षांत पहिले एक वर्ष वगळता शहराला काँग्रेसचेच महापौर लाभले. २०१७च्या मनपा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च विजय मिळवून दिला. ८१ पैकी ७३ जागा जिंकणार्‍या या पक्षाने भाजपा आणि इतर पक्षांचा दारूण पराभव केला.

आता सुमारे ८ वर्षांनंतर नांदेडमधील राजकीय चित्रामध्ये लक्षणीय बदल झाला असून मनपाच्या पहिल्या निवडणुकीपासून भाजपाला दोन आकडी जागा जिंकू न देणार्‍या अशोक चव्हाण यांच्याकडे भाजपाचे नेतृत्व आले आहे. ८१ पैकी किमान ४१/४२ जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा प्रसंग खा.रवीन्द्र चव्हाण यांच्यावर येत आहे. काँग्रेसची विजयी-सत्ताप्राप्तीची परंपरा कायम राखण्याची जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे.

मनपा निवडणुकीत महायुतीतील ३ आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष युती किंवा आघाडी करून लढणार काय, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. खा.अशोक चव्हाण यांनी भाजपासाठी निवडणूक तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने इतर पक्ष फोडून आपल्या उमेदवारांची भरती केली होती. आता चव्हाणांसोबत काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या ३५ नगरसेवकांसह भाजपाचे पूर्वीचे ६ नगरसेवक आणि अनेक इच्छुक उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याने प्रभागनिहाय उमेदवार नक्की करताना त्यांच्या कुशल नेतृत्वाचा कस लागणार आहे.

काँग्रेसने २००७ पासून सर्व निवडणुकांत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. २०१७ साली तर विक्रमी यश मिळवले होते. आता या पक्षाचे बहुसंख्य माजी नगरसेवक भाजपावासी झाल्यामुळे जुन्या नगरसेवकांसोबत नव्या आणि होतकरू चेहर्‍यांना संधी देण्याचा पक्षाला मोठा वाव असून मुस्लिम आणि अनुसूचित जाती प्रवर्गाच्या प्रभागांतील बहुसंख्य जागा काँग्रेसला राखता येऊ शकतात. पण हिंदूबहुल भागातील खुल्या आणि ओबीसी प्रवर्गाच्या किमान १५ ते १८ जागा निवडून आणण्यासाठी खा.रवीन्द्र चव्हाण आणि इतरांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची भाजपासोबत युती झाली नाही, तर त्याचा लाभ काँग्रेस आघाडीला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपाने काँग्रेसी मतांच्या विभागणीसाठी काही राजकीय म्होरक्यांच्या माध्यमातून तिसर्‍या आघाडीचा घाट घातल्याचे समोर येत आहे.

चौकट नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या २०१७च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत झाली होती. निवडणुकीपूर्वी भाजपाने ‘मिशन ५१ प्लस’चा संकल्प सोडला होता. पण ८१पैकी केवळ ६ जागा या पक्षाला जिंकता आल्या. त्या निवडणुकीत भाजपाला २ लाख ५८ हजार ७२७ मते मिळाली होती तर ७३ जागा जिंकणार्‍या काँग्रेसने ४ लाख ८६ हजार ९५७ मते घेत घवघवीत यश प्राप्त केले. शिवसेनेला केवळ १ जागा आणि ९० हजार मते मिळाली. इतर पक्षांचा पार धुव्वा उडाला. त्या निवडणुकीत ५७८ उमेदवार रिंगणामध्ये होते.  त्यापैकी ३७० उमेदवारांची १२ लाख ८७ हजार ५०० रूपयांची अनामत रक्कम जप्त झाली.