सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रासह सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होत असताना अखेर निंबाळकरा यांना पुन्हा संधी मिळाली. उमेदवारी डावलली गेल्याने मोहिते-पाटील गटाला धक्का बसला आहे. आता त्यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मागील २०१९ सालच्या माढा लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून निवडून आणताना ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे शिल्पकार ठरले होते. परंतु गेल्या पाच वर्षात खासदार निंबाळकर व मोहिते-पाटील कुटुबीयांत तीव्र मतभेद झाले. भाजप पक्षश्रेष्ठींनीही त्याकडे लक्ष दिले नाही.
हेही वाचा >>>भाजपकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर
या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारीसाठी शर्थींचे प्रयत्न सुरू केले होते. एकमेकांविरूध्द शह-काटशह देण्याचेही प्रकार घडले. मोहिते-पाटील यांनी, आता माघार नाही, असा निर्धार करीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु अखेर खासदार निंबाळकर यांच्या बाजूने भाजपने कौल देत त्यांना दुस-यांदा संधी दिल्यामुळे मोहिते-पाटील गटाला धक्का बसला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर भाजपकडून मोहिते-पाटील यांची समजूत कशाप्रकारे काढली जाणार ? पुढे कोणत्या घडामोडी होणार, याबाबतही सार्वत्रिक उत्सुकता पसराली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोणते राजकीय पत्ते फेकले जाणार, याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.