कराड : पुसेसावळीतील अविनाश काशीद व कुटुंबीयांनी गणेशोत्सवात अवयवदान जनजागृती, वैद्यकीय मदत तसेच ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ अंतर्गत आरोग्य योजनांची जनजागृतीपर साकारलेली सजावट लक्षवेधी ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त ‘भरडधान्य गणेश’. यातून भरडधान्य प्रकार, पोषणमूल्य व उपयुक्तता, ‘पर्यावरणपूरक गणेश’, ‘लेक वाचवा’, ‘साक्षरता’, ‘सेंद्रीय शेती काळाची गरज’, ‘आयुर्वेद सर्वांसाठी’, ‘पंचगव्य गणेश’, ‘ग्रामीण संस्कृती’ अशा संकल्पनांवर काशीद कुटुंबीयांनी साकारलेल्या प्रबोधनपर सजावटीचे हे आठवे वर्ष आहे.

अवयवदान, वैद्यकीय मदतीच्या योजनांची जनजागृती शासन व सामाजिक संस्थांकडून करण्यात येते. नुकताच शासनातर्फे अवयवदान जनजागृती पंधरवडाही संपन्न झाला. परंतु, ग्रामीण जनतेत अवयवदान व वैद्यकीय मदतीबाबत गैरसमज असून, काशीद कुटुंबाने आपल्या घरगुती गणेशासमोरील सजावटीत अवयवदाता रुपातील (आयएम ऑर्गन डोनर) गौराई, अवयवदान म्हणजे नक्की काय, ते का करावे, अवयवदान शस्त्रक्रिया शासन नियमावली, अवयव प्रत्यारोपण व वैद्यकीय मदत याविषयी माहितीपर फलक, पुस्तके, अवयवदान नोंदणीसाठी शासनाच्या नोट्टो संस्थेचा क्युआर कोड, नेत्रदान पंधरावडा, वैद्यकीय मदतीसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची माहिती, वैद्यकीय मदत मार्गदर्शक पुस्तिका, राष्ट्रीय आरोग्य योजना, महात्मा फुले, ‘आयुष्यमान भारत’, ‘प्रधानमंत्री मातृवंदना’, ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ आयुष्यमान वयवंदना अशा योजना, धर्मादाय न्यास तसेच थॅलेसेमिया, कर्करोग, क्षयरोग, व्यसनमुक्ती, सुरक्षित मातृत्व- सुमन, बालकांचे लसीकरण याची माहिती फलकांद्वारे मांडण्यात आली आहे.

सजावटीस युवा मंडळे, वैद्यकीय व्यावसायिक, नागरिकांनी भेट देऊन या उपक्रमातून अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

‘अवयवदान जनजागृतीपर प्रयत्न’

अवयवदान जनजागृती विषयी अविनाश काशीद यांचे दशकाभरात शंभरावर लेख प्रसिद्ध झालेत. अवयवदान शस्त्रक्रिया व गरजू रुग्णांसाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून दीड कोटीहून अधिकची मदत नि:शुल्कपणे मिळवून दिली आहे.

या उपक्रमाबाबत पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या केंद्रीय समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, गणेशोत्सवाच्या सजावटीतून अवयवदान जनजागृतीसाठी झालेला प्रयत्न अवयवदान जनजागृतीला बळ देणारे आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे म्हणाले, या सजावटीतून अवयवदान, वैद्यकीय मदत व आरोग्य योजना यांच्या जनजागृतीच्या प्रयत्नातून गरजू रुग्णांना मदत, मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.