Bacchu Kadu Controversial Advice to Farmers: बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बच्चू कडू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. राज्यातील कृषी क्षेत्रावर आलेले संकट त्यातून शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या यावर बच्चू कडू भाष्य करत होते. यावेळी ते उपस्थितांना उद्देशून म्हणाले, “अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका.”
बच्चू कडू यांच्या या विधानावर आता राजकारणातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कडू यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “दिवाळीच्या दिवशी आपल्याला दुःखाची परिषद घ्यावी लागत आहे. तुम्ही विचारांची लढाई सोडून जातीपातीची लढाई सुरू केल्यामुळे शेतकरी मागे राहिला आहे. आपण कुठल्याही जाती-धर्माचे असलो तरी शेतकरी म्हणून एकत्र राहू शकतो की नाही. शेतकरी म्हणून आपल्याला लढता येईल का? याचा निळा, त्याचा भगवा, कुणाचा हिरवा, पिळवा.. या सर्व रंगाचे कापड आमच्या कापसापासून बनते. हा कापूस शेतकरी पिकवतो.”
“माजी शेतकरी नेते शरद जोषी यांनी शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान केले. त्यांची कोणती जात होती, हे मी सांगणार नाही. पण त्यांनी स्वतः शेती केली. त्यांची राखरांगोळी झाली. पत्नीने आत्महत्या केली आणि हिंगणघाटमध्ये शेतकऱ्यांनीच त्यांना निवडणुकीत पाडले. मलाही शेतकऱ्यांनीच पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही निवडणुकीत पराभूत केले गेले. शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. पण त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे”, असे विधान बच्चू कडू यांनी केले.
बच्चू कडू बालिशपणाचे बोलू नये
बच्चू कडू यांच्या विधानावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, बच्चू कडू यांनी आता बचकंडेगीरी थांबवावी. त्यांनी बालिशपणाने बोलू नये. त्यांनी सामाजिक काम करावे. नाहीतर कापून टाकू, झोडून टाकू, हे प्रकार त्यांच्याबरोबर होऊ नयेत. वाद निर्माण करणाऱ्यांमध्ये बच्चू कडू यांचे नावही घेतले जाईल.
या सभेत बच्चू कडू यांनी आणखी काही वादग्रस्त विधाने केली आहेत.
बच्चू कडू यांनी दिले स्पष्टीकरण
आमदारांना कापा, या विधानावर माजी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, माझ्या बोलण्यामुळे काही जणांना दुःख झाले. पण रोज १२ शेतकरी तुमच्या धोरणामुळे आत्महत्या करत आहे. मग शेतकऱ्यांनी रोज मरण्यापेक्षा आमदारांना का कापू नये? शेत मालाला हमीभाव नाही, शेतकऱ्याचे पिक कवडीमोल दराने विकले जात आहे. यांना लाज वाटायला नको का? कर्जमाफी बाजूलाच राहिली पण २० टक्के बोनस देण्याची घोषणा झाली, त्याचे काय झाले? असे प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केले.
