रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष म्हटलं. यावरून काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका धर्माचे कसे होऊ शकतात?” असा सवाल बाळासाहेब थोरातांनी विचारला. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदेव बाबांच्या वक्तव्यावरही बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “रामदेव बाबा मुख्यमंत्र्यांना भेटूले बोलले की, एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे सर्वात मोठे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका धर्माचे कसे होऊ शकतात.”

“आपल्या घटनेने सर्वधर्मसमभाव हे सूत्र ठेवलं आहे”

“लोकशाहीने, आपल्या घटनेने सर्वधर्मसमभाव हे सूत्र ठेवलं आहे. मुख्यमंत्री सर्वांचेच असतात. मी कोणत्याही एका धर्मापेक्षा सर्वांचा आहे, हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. किमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा आहे,” असं थोरातांनी म्हटलं.

“‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते, आता मात्र…”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज ठाकरे यांची वाटचाल कशी चालली आहे हे आपण पाहत आलो आहोत. आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत.”

“२४ तासात भाजपाचे तीन मोठे नेते राज ठाकरेंना भेटले”

“गेल्या २४ तासात भाजपाचे तीन मोठे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे यातून भाजपासोबत युती होण्याचे काही संकेत मिळत आहेत,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले होते?

योगगुरू रामदेव बाबांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं सांगितलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो”, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

हेही वाचा : “…तर चौथे मोदी जेवले म्हणून समजा”; जीएसटीवरून बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारला टोला

“बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. एकनाथ शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असं आम्हाला वाटतं. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं”, असंदेखील रामदेव बाबांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat criticize eknath shinde over ramdev baba remark rno news pbs