जालना – राज्यातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एस.टी.) समावेश करावा, या मागणीसाठी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात सुरू केलेले बेमुदत उपोषण विजय चव्हाण यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर नवव्या दिवशी मागे घेतले.

मंत्री संजय राठोड, पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार अर्जुन खोतकर यांनी शनिवारी उपोषणस्थळी विजय चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करवून दिले. यानंतर चव्हाण यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले असल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले.

परवानगी मिळाली नाही म्हणून चव्हाण यांनी पहिल्या दिवशी झाडावर उपोषण सुरू केले होते. दिवाळीच्या कालावधीतही त्यांचे उपोषण सुरूच होते. अनेक बंजारा समाज बांधवांनी दिवाळी आणि गोवर्धनपूजाही उपोषणाच्या ठिकाणीच केली. या काळात बंजारा समाजातील महिलांनी रस्त्यावर स्वयंपाक करून मोर्चाही काढला होता. हैदराबाद गॅझेटिअर आणि सी.पी. बेरार करारानुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एस.टी.) समावेश करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.