लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशात बारामतीतला सामना हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा होऊ शकतो. म्हणजेच हा सामना अप्रत्यक्षपणे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा रंगणार आहे. अजित पवार भाजपासह गेल्याने त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काटेवाडीत बैठक घेऊन त्यांनी प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते असा उल्लेख केला होता. तसंच नालायक असा शब्दही त्यांनी वापरला होता. या प्रकरणी आता एका पत्रातून दिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीनिवास पवार यांनी काय म्हटलं होतं?

“तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही.” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

“पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे! पुढच्या काही वर्षांत दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही” अशी टीकाही श्रीनिवास पवार यांनी केली होती. आता या टीकेला पत्रातून उत्तर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये नालायक या शब्दाचा उच्चार करण्यात आला आहे.

काय आहे सूज्ञ बारामतीकरांचं पत्र?

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी-खोटा सहानुभूतीदार

श्रीनिवास बापू नालायक हा शब्द किती सहज आपण वापरला. पण हा शब्द वापरत असताना आपण सोयीस्करपणे विसरला आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले? एका बाजूला समाजाप्रति आपण काहीतरी देणं लागतो म्हणायचं आणि दुसरीकडे अजित पवारांचे बंधू म्हणून स्वतःला मिरवायचे काम केले. कुठलीही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपल्या व्यवसायांत स्वकर्तृत्व आणि जिद्द या जोरावर आपला ठसा उमटवते. अजितदादांकडे पाहिले तर त्यांनी सर्वच क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवाल आहे. अजित दादा पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत काम करतात. जनतेत मिळतात, त्यांची कामं मार्गी लावतात. हे बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याची कबुली इतर मान्यवरांसह खुद्द शरद पवार यांनीही वेळोवेळी दिली आहे.

हे पण वाचा- Shrinivas Pawar: सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”

बापू तुम्ही असंही म्हणालात की, मला शरद पवार यांच्यासारखे काका मिळायला पाहिजे होते. पण तुम्ही हे विसरलात की फक्त काका मिळून चालत नाही. कसोटीला उतरण्याठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात. तुम्ही जे मत अजित पवारांविषयी व्यक्त केलंत त्यामागे कुठला ना कुठला तरी स्वार्थ लपलेला आहे का? अशी शंका उपस्थित होते आहे.

बारामतीकर म्हणून असं वाटतं की तुम्ही एकतर अजित पवारांना कायम व्हिलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाले असावेत किंवा बायको-पोरांच्या राजकीय महत्वकांक्षेपोटी आपण हे पाऊल टाकले असावे. शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की आम्ही घोंगडं भिजवत ठेवणाऱ्या खोट्या सहानुभूतीदार लोकांच्या मागे उभं न राहता प्रत्यक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजित पवारांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.. आणि श्रीनिवासबापू आमचं ठरलंय.. घड्याळ तेच वेळ नवी.

बारामतीकर

हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आता याबाबत श्रीनिवास पवार काही भाष्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramatikar letter reply viral after shreenivas patil criticized ajit pawar scj