शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले.शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं स्पष्ट होत आहे. यावर वस्तुस्थिती समोर यावी म्हणून जाहीर चर्चा करावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यांच्या या आव्हानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि बिनकामाचे वाटले की काय?,” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

आदित्य यांचे मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान; ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाचा वाद

“त्यांना चर्चाच करायची असेल तरी बिनकामाचे रिकामटेकडे माजी मुख्यमंत्री घरी बसून आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करावी,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले ?

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाला दिलेल्या सवलती आणि राज्यात प्रकल्प उभारण्याबाबत सामंजस्य करार करण्याविषयी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेले व माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेले पत्र आदित्य ठाकरेंनी जाहीर केली. यावरुन हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता हे सिद्ध होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे स्पष्ट होते. यावर वस्तुस्थिती समोर यावी म्हणून जाहीर चर्चा करावी, असे आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेदांतच्या प्रमुखांसह बैठक झाल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेल्याकडे लक्ष वेधत ती भेट प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी होती की गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी होती, असा सूचक सवाल करत या भेटीची माहिती एकनाथ शिंदे यांना होती का, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.

एमआयडीसीच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाच्या प्रमुखांना लिहिलेले पत्र माहिती अधिकारांतर्गत मिळवल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रामध्ये ‘वेदांत – फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्यात उभारण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यासाठी वेदांतचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांना बैठकीला येण्यासंदर्भात त्यात विनंती करण्यात आली होती. ५ सप्टेंबर २०२२ चे हे पत्र आहे. पत्रात सवलती, सुविधांचा उल्लेख आहे. पुढील प्रक्रिया करण्यासाठी मी आपणाला मुंबईला यावे, तुमच्या सोयीची तारीख निश्चित करण्यासाठी आमंत्रित करतो आहे. मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे, असा पत्रात उल्लेख. याचाच अर्थ ‘वेदांत-फॉक्सकॉन’चा प्रकल्प येणार होता हे स्पष्ट होते. जुलैच्या अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेदांतच्या अधिकाऱ्यांसह जाहीर बैठक झाली. पण २९ ऑगस्टला दुसरी बैठक झाली ती उपमुख्यमंत्र्यांची. ती वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी होती की गुजरातला हलविण्यासाठी होती, असा सूचक सवाल आदित्य यांनी केला. यावर नुसते खोटे आरोप करण्यापेक्षा जाहीर चर्चा करा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp atul bhatkhalkar on shivsena aditya thackeray challenge to cm eknath shinde over vedanata foxcon sgy
First published on: 30-11-2022 at 09:41 IST