शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. संभाजी भिडेंनी यावेळी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं असून, त्यावर टीका होत आहे. भाजपाच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून, टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आहे?

“चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत. त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलत असताना मराठी संस्कृतीला शोभणारे कपडे का घालत नाही? आपण सगळ्या गोष्टींचं पाश्चिमात्यीकरण करत आहोत. काय घालायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात. आत्मनिर्भर भारत म्हणत असताना चॅनेलवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही,” अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

टिकली वादानंतर पहिल्यांदाच संभाजी भिडे आले समोर, प्रसारमाध्यमांनी घेरताच संतापून म्हणाले “वाटेत आडवे…”

चित्रा वाघ यांची टीका

चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानावर टीका केली असून, व्हिडीओ ट्वीट करत ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? अशी विचारणा केली आहे. चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या असंही त्या उपहासात्मकपणे म्हणाल्या आहेत.

भिडेंच्या कोणत्या वक्तव्यावरुन झाला होता वाद?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला होता. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला होता की ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chitra wagh on ncp supriya sule statement over woman in channel not wearing saree sgy