मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी भाषेसाठी भांडतायेत. इतर शाळेत तुम्ही मराठी सक्ती केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी भाषा सक्तीच्या मागे लागलात. तुमच्यावर कोण दबाव टाकतंय? असं राज ठाकरे म्हणाले. आता राज यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
राज ठाकरे यांनी “महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानंच नाही, शाळाही बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय,” असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. राज यांनी हिंदीच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.
“मराठी विरूद्ध हिंदी हा संघर्षच नाही तरीही राज ठाकरे तो दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची आहेच व हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले आहे
वर्षानुवर्षे मुंबई महापालिका निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भाषणे नेहमी होतात परंतु राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्यानेही तीच रिऽऽ ओढावी हे दुर्दैवीच…!” असं केशव उपाध्ये यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं.
राज ठाकरे काय म्हणाले?
“मराठी माणूस, मराठी भाषा याबाबतीत राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही. तुम्हीही तसंच जगलं, वावरलं पाहिजे. जे कोणी अमराठी लोक राहत असतील त्यांनी लवकरात लवकर मराठी शिकावं. तुम्हा सर्वांना सांगणं आहे- ट्रेन-बस- टॅक्सी कायमस्वरुपी तुम्ही समोरच्याशी मराठीतच बोला. त्याला मराठीत बोलायला भाग पाडा,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
“महाराष्ट्र भोगतोय. बाकी राज्यात त्यांच्या त्यांच्या भाषेला जपतात. तुम्ही खंबीर राहा, कडवट राहा. तुम्ही खडकासारखे टणक असायला हवं. कोण जातंय, कोण येतंय याकडे तुमचं लक्ष असायला हवं. सतर्क राहा,” असं राज ठाकरे सभेत म्हणाले.