सध्या देशभरात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला असून संध्याकाळपर्यंत नव्या कॅबिनेटची अंतिम यादी स्पष्ट होणार आहे. मोदींया नव्या कॅबिनेटमध्ये यंग ब्रिगेडचा समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या खासदार आणि भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील इतर काही इच्छुक नेत्यांसोबतच खासदार प्रीतम मुंडे देखील दिल्लीत दाखल झाल्याची बातमी पसरली असताना ते वृत्त चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून हे ट्वीट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजीनामे आणि मंत्रिमंडळ विस्तार!

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच ऐन करोनाच्या काळात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देखील राजीनामा दिला आहे. याशिवाय, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल, सदानंद गौडा, संतोश गंगवार, देबर्षी चौधरी, रतनलाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी, अश्विनी चौबे यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

पंकजा मुंडेंचं ट्वीट!

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये यंग ब्रिगेडसोबत खासदार प्रीतम मुंडे यांचा देखील समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. यासाठीच खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्या असल्याचं वृत्त समोर आलं. मात्र, ते वृत्त चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत”, असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नारायण राणेंची मंत्रिमंडळात वर्णी

राज्यातील काही महत्त्वाच्या नावांसोबतच भाजपाच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde on modi cabinet expansion pritam munde in delhi news pmw