Amit Shah BJP Office Bhumipoojan : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात महाराष्ट्र भाजपाच्या मुंबईतील नव्या कार्यालयाचं भूमिपूजन अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते. भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस शुभ असून भाजपाचं कार्यालय हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह काय म्हणाले?
“आज सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी शुभ दिवस आहे. कारण आज महाराष्ट्र भाजपाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. आजपासून महाराष्ट्र भाजपा एक नवी सुरूवात करत आहे. जेव्हा भाजपाची स्थापना झाली तेव्हापासून ते आज २०२५ पर्यंत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपासून ते सर्व नेत्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की कार्यालय हे आपल्यासाठी एक मंदिर असतं. बाकीच्या सर्व पक्षांसाठी कार्यालय हे एक कार्यालय असेल. पण भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी भाजपाचं कार्यालय हे मंदिरापेक्षा कमी नाही”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
“जन संघाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही नेहमी राजकीय पक्ष चालवण्याच्या विचारांचा स्वीकार केलेला आहे. आम्ही नेहमी सिद्धांताच्या आधारावर आमच्या नितीला घडवलं आहे. आम्ही भारतातील लोकांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष केला आहे. आता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात देखील एक मजबूत हस्ताक्षर आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील भाजपाचं कार्यालय कसं आहे?
“महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एक लायब्ररी, सहा मीटिंग रूम, एक कॉन्फरन्स हॉल, ४०० शीट असलेलं एक भव्य सभागृह, पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांचं ऑफिस आणि मुख्यमंत्र्यांसाठी देखील ऑफिस बनवलं आहे. एवढंच नाही तर काही कार्यकर्त्यांना राहता येईल त्यासाठी देखील कार्यालयात व्यवस्था करण्यात आलेली आहे”, असं अमित शाह यांनी भाषणात बोलताना सांगितलं आहे.
भाजपाची कार्यालये सेवा आणि लोककल्याणाचे प्रतीक आहेत. मुंबई येथे महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करीत आहे.
— Amit Shah (@AmitShah) October 27, 2025
मुंबई में महाराष्ट्र भाजपा के नए कार्यालय का भूमि पूजन कर रहा हूँ।@BJP4Maharashtra https://t.co/gtqZeoDDy1
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भूमिपूजन पार पडल्यानंतर केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सगळ्यांची इच्छा होती की मुंबईत प्रदेशाला एक चांगलं कार्यालय मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही जागा शोधत होतो. फार सरकारी जागेच्या मागे न जाता परवडणारी, खासगी जागा मिळवण्याचा प्रयत्न चालाला होता. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली. या जागेत अनेक अडचणी होत्या. एक-एक अडचण आम्ही दूर केली. हळूहळू ही जागा आपण मिळवली काही लोकांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उभं केले, त्यांना मी सांगतो भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे उपर पत्थर फेंकने का प्रयास मत करो,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
