राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश दिल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असा इशारा देत कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आम्ही तसं म्हटलं नाही, तर जेलमध्ये टाकणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला मुनगंटीवारांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हॅलो शब्द १८ व्या शतकात आला. आश्चर्य व्यक्त करणं असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांची ही आठवण पुसून काढली पाहिजे. आपल्या मराठी पुस्तकात वंदे मातरमचं सुंदर वर्णन करण्यात आलं आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा देशभक्ताच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम प्राणप्रिय आहे,” असं मुनगंटीवार म्हणाले.

“केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा असं मी म्हटलं नाही” सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

“जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु. हा काही जातीय, धर्मांध शब्द नाही,” असंही त्यांनी सांगितलं. “मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हे अभियान चालवायचं आहे. शिवसेनेचं किंवा इतर कोणत्या पक्षांचं काय म्हणणं आहे हे गौण आहे,” असं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा- शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं का? अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आव्हाडांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले “हे अभियान आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा करुन आम्ही जेलमध्ये टाकू असं सांगितलेलं नाही. हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे की, योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करु शकलो नाही. हॅलो शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वंदे मातरम वापरावं इतकंच म्हटलं आहे. यामध्ये श्वास आणि इतके मोठे शब्द वापरण्याची गरज नव्हती”.

महत्वाची खाती भाजपाकडे –

“शिवसेनेकडे जी खाती होती ती त्यांच्याकडे आहेत. भाजपाने चांगली खाती घेतली असं म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपाकडे जी खाती आहेत, ती शिवसेनेने विचारपूर्वक, चिंतन करुन काँग्रेस, राष्ट्रवादीला दिलेली खाती आहेत. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते आणि सध्या आम्ही आहोत. शिवसेनेने यावर टीका करणं म्हणजे आपल्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही म्हणत निंदा करुन घेण्यासारखं आहे,” अशी टीका मुनगंटीवारांनी केली.

बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “सकारात्मक विरोधी पक्ष असावा अशी अपेक्षा आहे. जिथे आम्ही चुकत असू, जनसेवेची कामं करताना मागे पडत असू, वेग कमी असेल तिथे विरोधकांनी भाष्य केलं पाहिजे. पण अडीच वर्ष सत्ता असताना ज्या गोष्टींबद्दल जे निर्णयच करु शकले नाहीत, त्याबद्दल आज तत्वज्ञान सांगू नये. आम्ही केल्यानंतर हे राजकारणात किती अपात्र होते हे सिद्ध होईल, पण तशी आमची इच्छा नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sudhir mungantiwar on ncp jitendra awhad vande mataram hello sgy
First published on: 16-08-2022 at 10:40 IST