सोलापूर : सोलापूरचे होटगी रस्त्यावरील जुने विमानतळ आकाराने खूपच तोकडे पडत असल्याने तेथून रात्रीची विमानसेवा सुरू होणे अशक्य असल्याच्या पार्श्वभूमीवर शेवटी राजकीय इच्छाशक्तीअभावी अडगळीत पडलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्ययावत माहिती घेतली आहे.
सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी जुन्या विमानतळाचा विकास करण्यात आला होता. त्यासाठी विमानतळालगतच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाची उंच चिमणी अडथळा येते म्हणून पाडण्यात आली होती. शिवाय सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ विकसित करण्यात आले होते. परंतु केवळ ३५० एकर क्षेत्राचे हे जुने विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आणि गेल्या नऊ जून रोजी गोवा-सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली. तथापि, मुंबई, हैदराबाद, तिरुपती आदी महानगरांना सोलापूरची विमानसेवा जोडण्याची मागणी केली जात असताना रात्रीच्या विमानसेवेची सोय नसल्यामुळे हे विमानतळ अपुरे आणि गैरसोयीचे वाटत आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीची विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने बोरामणी विमानतळाचा विचार समोर आला आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अद्ययावत माहिती घेतली आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भविष्याचा विचार करून येथील टेक्स्टाईल, गारमेंट उद्योगासह फलोत्पादनाच्या हवाई वाहतुकीसाठी, तसेच नागरी प्रवास वाहतुकीसाठी २००८ साली आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाची घोषणा केली होती. त्यानुसार ६२० हेक्टर जमिनीचे संपादनही करण्यात आले होते. विमानतळाचा विकास करण्यासाठी ६२५ कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. याशिवाय शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कंपनीही स्थापन करण्यात आली होती. परंतु मधल्या काळात २०१४ आणि २०१९ या दोन लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले आणि बोरामणी विमानतळाचा विकास दुर्लक्षित राहिला. दरम्यान, विमानतळालगत वनखात्याची सुमारे ३३ हेक्टर जमीन असल्याची अडचण समोर आली. हा प्रश्नही तसाच प्रलंबित राहिला. या पार्श्वभूमीवर आता शेवटी सोलापूरचे जुने विमानतळ अडचणीचे आणि कालबाह्य ठरू लागल्याने बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
‘नाइट लँडिंग’चा प्रस्ताव
सोलापुरात होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळाशेजारी अतिक्रमणे आणि भूसंपादनाचा विषय असल्यामुळे या ठिकाणी विमानाचे ‘नाइट लँडिंग’ होऊ शकत नाही. त्यामुळे बोरामणी विमानतळाचा ‘ नाइट लँडिंग’ साठी प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे. बोरामणीत सुमारे १८०० एकर जागा विमानतळाच्या ताब्यात आहे. मात्र, लगतच वनखात्याच्या ३३ हेक्टर जमिनीचा विषय मार्गी लावणे, तसेच अतिक्रमण काढणे यावर भर देऊ. या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांना अद्ययावत माहिती अवगत केली जाईल. – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर.