मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जवळीकता वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि निवडणुकीत मनसे-भाजपा-शिंदे गट अशी युती दिसण्याची शक्यता आहे. त्यात भाजपा आणि मनसेकडून युतीचे संकेत मिळत आहेत.
मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. त्यापूर्वी अंधेरी-पूर्व निवडणुकीतून माघार घेण्यासाठी राज ठाकरेंनी पत्र लिहत आवाहन केलं होतं. त्याची दखल घेत भाजपाने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. त्यामुळे मनसे-भाजपा-शिंदे गट यांच्यात युतीबद्दल सर्वकाही अलबेल असल्याचं चित्र दिसत आहे. या सर्व प्रकरणावरती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; आता ‘सामना’वर सदावर्तेंकडून बंदीची मागणी
कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मनसेबरोबरच्या युतीचा प्रस्ताव अजून आला नाही. प्रस्ताव आल्यास भाजपा महाराष्ट्राची १३ जणांची कोअर कमिटी निर्णय घेते. मात्र, आमची याबद्दल बैठक झाली नाही. त्यामुळे यावरती चर्चा करण्याची आवश्यकता नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज ( २५ ऑक्टोंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगितलं जातं आहे. श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के हेही ‘शिवतीर्थ’वर उपस्थित होते.