मुंबई – नाशिक महामार्गाची दुर्दशा झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वेळेत इच्छित स्थळी पोहोचणे अवघड होते. या मार्गावरून मुंबई गाठणाऱ्या आमदारांनाही हाच त्रास सहन करावा लागत आहे. अखेर, काही आमदारांनी हा त्रास टाळण्याकरता रेल्वे प्रवास केल्याचंही समोर आलं आहे. मात्र, या मार्गावर खड्डेच नाहीत, असा दावा दीपक केसरकर यांनी केल्याचं पत्रकारांनी सांगताच अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दीपक केसरकर यांच्यावर उपरोधिक टोला लगावला आहे.

हेही वाचा >> “मला खात्री आहे की…”, मोदी आणि शहांचं नाव घेत भुजबळांची संभाजी भिडेंवर टीका; म्हणाले, “कोणताही गुजराती…”

“दीपक केसरकर यांची गाडी रस्त्याच्या वरून चालत असेल. बुलेट ट्रेन कशी रुळांवर अंतर ठेवून जाते तसं”, असा उपरोधिक टोला छगन भुजबळ यांनी दीपक केसरकर यांना लगावला. “सर्व आमदार वेडे आहेत का? सगळ्या आमदारांनी टीका केली आहे. आम्ही सर्व आमदार ट्रेनने आलो. खड्डे दुरुस्त करा, पण खड्डे नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. मुंबई महानगरपालिका जे कोल्डमिक्स वगैरे वापरते त्याचा वापर करता येईल. पावसाची उघडीप झाली की खड्डे व्यवस्थित भरता येतील”, असा सल्लाही भुजबळांनी यावेळी दिला.

“स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांना खड्डे बुजवाण्याचे आदेश दिले आहेत. दीपक केसरकर सांगत असतील की खड्डे नाहीत तर ही बैठक निष्फळ आहे”, असंही भुजबळ म्हणाले.

देवाचा धावा करून धरणं भरा

त्या दिवशी मी योगायोगाने शिर्डीमध्ये गेलो होतो. कोल्हापुरात राधानगरीत पाणी सोडल्यानंतर ५ फुटांनी लेव्हल वाढतं, परंतु यावेळेला वाढलं नाही. मी स्वतः ठाण मांडून होतो. ठाण मांडून बसत असताना आपण देवाला प्रार्थनालाही करतो. या प्रार्थनेतही ताकद आहे, असं दीपक केसरकर म्हणाले होते. यावर छगन भुजबळ म्हणाले की, “तुम्हीही देवाच धावा करा आणि आमची धरणं भरू द्या. सर्व धरणं खाली आहेत. एखादं धरण भरलं आहे, मग आनंद आहे ना त्यांच्या धावाने धरण भरलं तर.”

हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई- नाशिक महामार्गाची पाहाणी

एकनाथ शिंदेंकडून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मुंबई नाशिक महामार्गाची पाहाणी केली. मागील काही दिवसांपासून महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाहाणी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश दिले आहेत.