राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत असा गंभीर आरोप राज्याचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं. काय म्हणाले छगन भुजबळ? "आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत." असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला. हे पण वाचा- “मनोज जरांगेंना भुजबळ नावाची कावीळ, त्यांनी..”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका शरद पवार बैठकीला आले नाहीत आरक्षणाचा वाद मिटावा म्हणून सह्याद्री भवनावर सरकारने मिटिंग बोलवली होती. सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आली होती. विरोधी पक्षातले नेते येणं क्रमप्राप्त होतं. आम्ही विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांना सांगितलं होतं. शरद पवारांनाही या बैठकीला बोलवा हे सांगितलं होतं. व्ही. पी. सिंग यांनी जे आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केली म्हणून आम्ही आजवर त्यांचे आभारही मानले. मात्र ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा अपेक्षा हीच असते की शरद पवारांनी बैठकीला यायला हवं होतं. पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे, भुजबळांचा पवारांना टोला "विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. आम्ही सगळ्या विरोधी पक्षांना सांगतो आहे की सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, तुमचे मुद्दे मांडा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, आमचे झेंडे हाती घेतो. मात्र सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ" असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. निवडणुकीतील फायद्यासाठी ‘ओबीसीं’चा प्राण घेऊ नका! छगन भुजबळ यांचे सरकारला आवाहन (संग्रहित छायाचित्र) राज्यातल्या सामाजिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असंही छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली.