मुंबईः राज्यातील खाजगी विद्यापीठे वेगाने पुढे येत असताना सार्वजनिक विद्यापीठांची ढासळती गुणवत्ता, घसरते मानांकन चिंताजनक असून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानांकन सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. प्रत्येक विद्यापींठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा असे आदेशही त्यांनी दिले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ संदर्भात आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी,तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू उपस्थित होते.
उच्च शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यापीठ मानांकनाची सध्यस्थिती याचे आत्मपरीक्षण करून गुणवत्ती वाढीसाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्राशी करार, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम तयार करून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. खाजगी विद्यापीठे वेगाने पुढे येत आहेत, त्यामुळे सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे.असेही त्यांनी सांगितले.
प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करावा असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले.
