CM Devendra Fadnavis On Indira Gandhi : अभिनेत्री कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कंगना राणौत यांनी भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारलेली आहे. आज (१६ जानेवारी) इमर्जन्सी या चित्रपटाचं मुंबईत स्क्रीनिंग पार पडलं. या स्क्रीनिंगला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इमर्जन्सी चित्रपटाच्या सर्व टीमचं कौतुक केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना एक मोठं विधान केलं. “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या होत्या. पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“इमर्जन्सी हा चित्रपट महत्वाच्या विषयावर बनवला आहे. इमर्जन्सी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो. खरं तर आणीबाणीचा काळ हा आपल्या सर्वांसाठी असा काळ होता, जेव्हा देशातील सर्वांचेच मानवाधिकार समाप्त करण्यात आले होते. आणीबाणीचा काळ हा माझ्यासाठी वैयक्तिकरित्या महत्वाचा होता. कारण आणीबाणीच्या काळात माझे वडील जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. तेव्हा मी पाच वर्षांचा होतो. तेव्हा मला वडिलांना भेटायचं असेल तर न्यायालय किंवा तुरुंगात जावं लागत होतं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“आजही त्या आठवणी माझ्या मनात आहेत. आणीबाणीचा तो काळ कंगना राणौत यांनी पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणला आहे. कंगना राणौत सर्वच भूमिकेला न्याय देतात. या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत आहेत. इंदिरा गांधी देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या. पण त्या काळात आमच्यासाठी त्या (इंदिरा गांधी) व्हिलन होत्या. पण ठीक आहे, प्रत्येक कालखंडाची एक वेगळी कहाणी असते. इंदिरा गांधी यांनी देखील देशासाठी चांगलं काम केलेलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis big statement to indira gandhi and kangana ranaut emergency movie released gkt