Devendra Fadnavis on Love Jihad Law: लव्ह जिहाद विरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात ही घोषणा करण्यात आली असून समितीचे सदस्य कोण असतील, त्याची कार्यपद्धती कशी असेल? याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समिती स्थापन करण्याचे कारण आणि या कायद्याची गरज का आहे? हे सांगितले. नागपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी लव्ह जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आली आहे. केरळ उच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काही नाही. पण खोटे बोलून, खोटी ओळख तयार करून, फसवणूक करून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे, ही प्रवृत्ती समाजात पसरत आहे. जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे योग्य नाही. त्यामुळे यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल ती राज्य सरकारकडून केली जाईल.

बळजबरीने होणारे धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) रोखण्यासाठी लवकरच कायदा करू, असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळात केले होते. अशाप्रकारचा कायदा याआधी उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यात अस्तित्वात आलेला आहे.

शासन निर्णयात काय म्हटले?

राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवदेने सादर केली होती. भारतातील काही राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहादच्या विरोधातील कायदा करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून निर्णयाचा विरोध

दरम्यान एनडीएतील घटक पक्ष आरपीआय (आय)चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र या समितीवर आक्षेप नोंदविला आहे. ‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास असे म्हणणे योग्य नाही. दलित-सवर्णसुद्धा एकत्र येतात. मुले-मुली एकत्र येतात, अशी लग्न होतात. हिंदू- मुस्लिम लग्न झाले, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis reaction on formed seven member panel about love jihad law kvg