Devendra Fadnavis : महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते आशिष शेलार, जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पाच रेडिओ जॉकींनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली असता यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
दरम्यान, महाविद्यालयीन काळात कविता, गाणी लिहिण्याचा छंद होता असं सांगत फडणवीसांनी म्हटलं की आपण एक गाणं रामावर तर दुसरं शंकरावर लिहिलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शीघ्रकविता ऐकवून दाखवली. तसेच महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी देखील रेडिओ महोत्सवाच्या या कार्यक्रमात त्यांनी सांगितल्या.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना एक गाणं गाण्याचा आग्रह जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी केला. त्यांच्या आग्रहास्तव देवेंद्र फडणवीस यांनी ‘अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं…,’ हे गाणं गायलं. त्यांनी गाणं गायल्यानंतर जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांचं कौतुक केलं.
‘त्यानंतर मॉडेलिंगची कधीच हिंमत केली नाही’
तुमच्या हिरोगिरीची सुरुवात तुम्ही कॉलेजमध्ये असताना मॉडेल म्हणून झाली, आम्ही असंही ऐकलंय की तुम्हाला मॉडेलिंगसह लिहिण्याचाही छंद आहे. तु्म्ही कवी देखील आहात, मग तुम्ही पहिलं काय लिहिलं होतं तुम्हाला आठवतं का? असा प्रश्न रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “सर्वात आधी तर मी हे सांगतो की मॉडलिंग हा अपघात होता. माझ्या काही मित्रांनी माझ्याबरोबर केलेला प्रँक होता. पण तो त्यावेळी चालला. मी सुदैवाने वाचलो आणि त्यानंतर मॉडेलिंगची कधीच हिंमत केली नाही.”
“मी नेहमी सांगतो की त्यावेळी जे मॉडलिंग केलं ते तेव्हा गाजलं. गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी असते. त्यामुळे माझ्या मॉडेलिंगचीही बातमी झाली होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
#WATCH | Maharashtra CM Devendra Fadnavis sings 'Abhi na jao…' at the Maharashtra Radio Festival and Maharashtra Asha Radio Gaurav Awards, in Mumbai.
— ANI (@ANI) June 21, 2025
Legendary singer Asha Bhosle also present. pic.twitter.com/S0sXEH4yLw
तिसरं गाणं कोणतं?
“मला लिहिण्याची आधीपासूनच आवड होती. कॉलेजमध्ये असताना कविता लिहित असायचो, कवी संमेलनाला वैगेरे जायचो. लहान असताना काही कविता लिहिल्या होत्या. मात्र, एक आहे की लिहिल्यानंतर ते कधी साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा ते लिहायचं आणि स्वत: वाचायचं. पण पब्लिकली फार कधी लिहिलं नाही. मात्र, हे नक्कीच आहे की दोन गाणे लिहिले आहेत. आपल्याकडे ज्यावेळी राम जन्मभूमीबाबत सुरु होतं तेव्हा मी रामावर एक गाणं लिहिलं आहे. तसेच मी शंकरावर एक गाणं लिहिलं आहे. ते शंकर महादेवन यांनी गायलेलंही आहे. बाकी तुम्हाला सांगतो की मी आणखी एक गाणं लिहिलेलं आहे. ते गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी तुम्हाला ते सांगणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.