एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतली आजवरची सर्वात मोठी बंडखोरी केल्यानंतर राज्यातलं उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. ४० आमदारांना घेऊन शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी केली आणि राज्यात शिंदे गट आणि भाजपा युतीचं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, तेव्हापासून हे ४० आमदार ४० खोके घेऊन फुटल्याचा आरोप सातत्याने ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये यावरून विरोधकांनी पायऱ्यांवर ‘खोके सरकार’ म्हणत आंदोलनही केलं होतं. या पार्श्वभूमीवर शनिवारी बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये शिंदे गटावर टीका केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाण्यात उद्धव ठाकरेंची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. “तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं.

“त्यांची मानसिकता ढळली आहे, नैराश्यातून…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; ‘कंटेनरभरून खोक्यां’चा केला उल्लेख!

“उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातून काहीच निष्पन्न नाही”

दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “पहिली गोष्ट तर शेतकऱ्यांचा मेळावा म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी तिथे भाषण केलं, त्यातलं कुणीही शेतकऱ्यांविषयी बोललं नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, अडचणी किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनानं काय करावं, यावर विरोधी पक्ष म्हणून ते काहीही बोलू शकले नाहीत. जे बोलले, त्यात खोके, बोके याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला विषयच नव्हता. त्यामुळे त्या शेतकरी मेळाव्यातून काही निष्पन्न झालं असं काही दिसलं नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.

“खोके आणि बोके.. खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का? उद्धव ठाकरेंनी सीआयडी वगैरे जेवढ्या यंत्रणा असतील, त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केलं, तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी फक्त एकदा हे सिद्ध करून दाखवावं”, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

“मी कुठेतरी वाचलंय, रेडा हे…”, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही वाघ होतो!”

“मातोश्रीवर आत्तापर्यंत जेवढे खोके गेलेत…!”

“त्यांच्या यंत्रणांना या ४० खोक्यांचा शोध घ्यावा लागेल. पण एवढं मात्र नक्की आहे की मातोश्रीवर आत्तापर्यंत जेवढे खोके गेलेत, त्याच्या एक टक्क्यांमध्येही आमचा विषय नाही”, अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे संजय गायकवाड नेमका कोणत्या टक्केवारीचा संदर्भ देत होते, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde group mla sanjay gaikwad on uddhav thackeray pmw
First published on: 27-11-2022 at 14:30 IST