मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या पैशांचं गोदाम सापडल्यामुळे ते भाजपाबरोबर जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी केला होता. या आरोपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे काय आहे, हे जनतेला माहीत आहे. माझ्याकडे पैसे किती आहेत? तर जनता आणि त्यांचे प्रेम हीच माझी कमाई आहे. काही लोक म्हणतात ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात. त्यांचे कंटेनर कुठून कुठे जातात? हेही सर्वांना माहीत आहे. दोन वर्षांनंतर त्यांना आता हा नवीन शोध कुठून लागला? असाही सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ठाकरेंना उठता-बसता खोके मोजल्याशिवाय चैन पडत नाही. आम्हाला मोह-माया नाही. मला बंगले बनवायचे नाहीत की हॉटेल बांधायचे नाहीत. आम्हाला जास्त बोलायला लावू नका, अन्यथा सर्व बाहेर काढू, अशा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची त्यांची पात्रता नाही. पण मोदीद्वेषाने पछाडलेल्या लोकांचा बंदोबस्त आणि उपचार जनता नक्कीच करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा

लंडन ते लखनऊ सर्व बाहेर काढू

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लडनच्या विश्रांतीचा उल्लेख केल्यानंतर अस्वस्थ होण्याचे कारण काय? आमच्याकडेही सर्व आहे. लखनऊमध्ये चतुर्वेदी नावाच्या इसमाची २०० एकरची जमीन प्राप्तीकर विभागाने जप्त केली. त्याच्यामागे कोण आहे? लंडनमध्ये कुठे प्रॉपर्टी आहे? याबद्दलची सर्व माहिती आम्हाला आहे. पण मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करू नयेत, हे त्यांनी मला शिकवले. पण दुर्दैवाने सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले उद्धव ठाकरे ही संस्कृती विसरले. मी त्यांच्या आरोपांना किमंत देऊ इच्छित नाही.

मिलिंद नार्वेकर यांना प्रस्ताव दिला का?

उद्धव ठाकरे यांचे सचिव आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे उबाठा गट सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी राजकीय वर्तुळात चर्चेला आली होती. नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून तिकीट दिले जाईल, असेही सांगितले गेले. या विषयावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी अशी शक्यता फेटाळून लावली. “मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझा संपर्क नाही. मी त्यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. ते आता उबाठा गटात आहेत. ते तिथे सुखी राहू दे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”, असे उत्तर त्यांनी दिले.