शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ एकीकडे सगळी समीकरणं बदलत असताना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर संतप्त भावना व्यक्त करतानाच राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.
“मी आज राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतोय”
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांमध्ये भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“..मी म्हटलं पवारसाहेब, मस्करी करताय का?”
दरम्यान, सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. “काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपण लढत आलो होतो. त्यानंतर जे घडलं, हे सर्वांना माहिती आहे. शरद पवारांसोबत तिन्ही पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीत आमचं सगळं ठरलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं उद्धवजी एक मिनीट बोलायचंय. बाजूला खोलीत गेल्यानंतर ते म्हणाले उद्धवजी, हे सगळं ठीक आहे. पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हटलं का? ते म्हणाले आमच्याकडे आणि काँग्रेसकडे ज्येष्ठ लोक आहेत. पण शिवसेनेकडून तुम्ही नसाल तर ते पुढे चालणं कठीण आहे. मी म्हटलं पवारसाहेब, मस्करी करताय का? मी महापालिकेत महापौर जिंकल्यानंतर फक्त अभिनंदन करायला जातो. म्हटलं साधा महापालिका न जिंकलेला माणूस मुख्यमंत्री कसा होईल? ते म्हणाले, नाही, हे तुम्हाला करावं लागले. मग केली जिद्द. मग शरद पवार, सोनिया गांधींनी माझ्यावर विश्वास टाकला”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री का बाहेर पडू शकले नाहीत?
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते घराबाहेर पडत नसल्याची टीका करणाऱ्यांना देखील उत्तर दिलं. “शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय का? मुख्यमंत्री भेटत नव्हते हे काही दिवसांपूर्वीपर्यंत खरं होतं. याचं कारण माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे दोन-तीन महिने फार विचित्र होते. मी कुणालाही भेटू शकत नव्हतो. तो काळ मी कुणाला भेटलो नाही हा मुद्दा बरोबर होता. पण त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली आहे. पण तेव्हा भेटत नव्हतो म्हणजे कामं होत नव्हती असं काही नव्हतं”, असं ते म्हणाले.