एजाजहुसेन मुजावर,लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यात आलेल्या करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा मागील तीन वर्षांपासून बंद असलेला गळीत हंगाम गेल्या महिन्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष येऊन सुरू केला असला तरी सध्या गाळप हंगामाचे नियोजन, संचालक मंडळाचा कथित आक्षेपार्ह कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कारखान्याचे संचालक मंडळ आणि कारखाना बचाव समितीच्या धुरिणांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

करमाळा तालुक्यात शेळगाव भाळवणी येथे ३० वर्षांपूर्वी सततच्या प्रयत्नांनंतर उभारण्यात आलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना नंतर अपेक्षित प्रगतीच्या दिशेने झेप घेऊ शकला नाही. केवळ अडीच हजार मे. टन ऊस गाळप क्षमतेचा हा कारखाना नेहमीच स्थानिक राजकारणाचा अड्डा बनत गेल्यामुळे रखडत रखडतच गाळप हंगाम करीत आहे. एकीकडे सुमारे १२८ कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आणि शेतकरी व कामगारांची देणी असताना अखेर तीन वर्षांपूर्वी हा कारखाना बंद पडला होता. राज्य शिखर बँकेने कर्जवसुलीसाठी आदिनाथ कारखाना जप्त करून लिलाव पुकारला असता बारामती अ‍ॅग्रो कंपनीने त्यात रस दाखविला आणि २५ वर्षांच्या भाडे करारावर कारखाना चालविण्यास घेण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. २५ वर्षांइतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी कारखाना भाडय़ाने देण्यास कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी तीव्र विरोध दर्शवीत लढा हाती घेतला होता. दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असता त्यांचे सहकारी, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने शासनाने हा कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या मार्फत चालविण्यासाठी दिला. त्यासाठी आवश्यक आर्थिक मदत प्रा. सावंत यांनी उपलब्ध करून दिली होती. गेल्या २५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: आदिनाथ साखर कारखान्याची चिमणी पेटविण्यासाठी आले होते. या कारखान्याच्या अडीअडचणी सोडवून कारखाना प्रगतिपथावर नेण्यासाठी आपले शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी कारखान्यात अग्निप्रदीपन करताना दिली होती.

मुख्यमंत्री शिंदे हे पाठीशी उभे राहिल्याने आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळासह सर्व सभासद शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा; परंतु कारखान्यात गाळप चाचणी सुरू होण्यापूर्वीच वाद पेटायला सुरुवात झाली. १६ जानेवारी रोजी कसेबसे ऊस गाळप सुरू होऊन साखर उत्पादन सुरू झाले. उत्पादित पहिले साखरेचे पोते आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते आदिनाथ महाराजांच्या मंदिरात अर्पण करण्यात आले. तेथून पुन्हा कारखान्याचे संचालक मंडळ आणि कारखाना बचाव संघर्ष समिती यांच्यात वाद उफाळून आला. ऊस वाहतूक, साखर वाहतूक आणि हमाली कामासाठीच्या निविदा काढण्यावरून संचालक मंडळ अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडले. कारखाना परिसरात २५ किलोमीटर अंतरावरील ऊस वाहतूक करताना दर निश्चित करण्यावरून वाद सुरू झाला. अन्य मुद्दय़ांवरही संघर्ष पेटला. यात कारखान्याचे संचालक मंडळ आणि कारखाना बचाव संघर्ष समिती चे धुरीण आमनेसामने आले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी आरोपांचे खंडन केले असले तरी वाद शमत नसल्याचे दिसून येते. कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक हरिदास डांगे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे कारखाना बचाव संघर्ष समितीची धुरा वाहात आहेत. यातच कारखान्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत , दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल आदींच्या तसबिरी लावण्यावरूनही वाद समोर आला आहे. यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील व सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेत असलेल्या कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका रश्मी बागल यांची भूमिका सक्रियपणे समोर आली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict in adinath sugar factory objectionable administration by board of directors zws