सांगली : भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची शक्ती परिक्रमा यात्रा सांगली जिल्ह्यात आली असताना इस्लामपूरमध्ये नियोजनातील गोंधळ समोर आला. श्रीमती मुंडे यांच्या स्वागताच्या प्रतिक्षेत काही भाजप कार्यकर्ते ताटकळत असताना त्यांचा ताफा कोल्हापूरला रवाना झाला. मात्र, या गोंधळाबद्दल श्रीमती मुंडे यांनी कार्यकर्त्यांची माफी मागून यावर पडदा टाकला असला तरी त्यांची राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळाला दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीमती मुंडे साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनासाठी शक्ती  परिक्रमा यात्रा करीत आहेत. या यात्रेचा सांगली जिल्ह्यातील विट्यात प्रवेश झाला. विट्यानंतर त्यांचा इस्लामपूर दौरा होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचा ताफा दुसर्‍याच मार्गाने कोल्हापूरकडे मार्गस्थ झाला. विक्रम पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, महेश पाटील आदींनी त्यांच्या स्वागताची तयारी शिवाजी चौकात केली होती. महिलांचीही गर्दी होती. या ठिकाणी न येता त्यांचा ताफा कोल्हापूरकडे रवाना झाल्याने उपस्थितामध्ये नाराजी पसरली. समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला. मात्र, श्रीमती मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची दूरदृष्य संवाद साधून माफी मागितली.

हेही वाचा >>> “एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी राज्यात…”, वसंत पुरके यांचे वक्तव्य; म्हणाले…

दरम्यान, तत्पुर्वी श्रीमती मुंडे यांनी तत्पुर्वी राजारामबापू कारखान्यावर जाउन स्व. बापूंच्या पुतळ्यापुढे पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपले आणि आमदार पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, यामुळे या भेटीला राजकीय संदर्भ देण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. गुरूवारी सकाळी त्यांनी सांगलीमध्ये श्री गणेशाचे दर्शन घेउन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुधीर गाडगीळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानी भेट देउन सोलापूरकडे मार्गस्थ झाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in planning in islampur during pankaja munde visit ysh