कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाकडून पोलीस यंत्रणेमार्फत वारंवार दबाव सुरू आहे, असा आरोप येथे एका बैठकीत करण्यात आला. याला तीव्र विरोध करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा अनेक कारणामुळे विरोध होत आहे. प्रकल्पाविरोधात जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलने होत आहेत. मात्र, राज्य शासनाकडून बळाचा वापर करून वारंवार दबाव आणला जात असल्याचा मुद्दा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.
चर्चेत उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, भुदरगड काँग्रेस नेते राहुल देसाई, सम्राट मोरे, सुयोग वाडकर, कृष्णात पाटील, तानाजी भोसले, शिवाजी कांबळे, एस. एन. पाटील, संग्राम पडोणकर आदींनी भाग घेतला.
बुधवारी राज्यव्यापी बैठक
दबावनीती लक्षात घेऊन याप्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी सायंकाळी राज्यभरातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. १२ जिल्ह्यांतील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.