अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांची अटक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, अशा अनेक घडामोडींमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन नेतेमंडळींची एकमेकांवर टोलेबाजी देखील सुरु आहे. सध्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक वक्तव्य केलंय. याच वक्तव्याला घेऊन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा तसेच चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय. यासाठी त्यांनी थेट गीतेचा संदर्भ दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन सावंत यांची बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. नरेंद्र मोदींच्या समर्पणाविषयी तसेच काम करण्याच्या पद्धतीचा दाखला त्यांनी वरील उदाहरण देऊन दिला. मात्र सावंत यांनी जो व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही तो योगी बनण्याची शक्यता धुसर आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. सचिन सावंत यांनी भगवद्गितेचा संदर्भ दिलाय. “चंद्रकांत पाटीलजी ढोंगी भाजपाने आधी भगवद्गीता वाचावी. अध्याय ६-१६ नात्यश्र्नतस्तु योगोSस्ति न चैकान्तमनश्र्नतः | न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन || म्हणजेच हे अर्जुन! जो अधिक खाता है या बहुत कम खाता है, जो अधिक सोता है या जो पर्याप्त नहीं सोता उसके योगी बननेकी कोई सम्भावना नहीं है,” असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले ?

चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी “झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते २४ तासदेखील झोपणार नाहीत,” असं वक्तव्यं करत मोदींची स्तुती केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sachin sawant criticize chandrakant patil over narendra modi sweeping statement prd