लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : माझी व माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मात्र, शेतकर्‍याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे पुढे येऊन सांगावे असे आव्हान उबाठा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सोमवारी मविआच्या बैठकीत दिले.

मविआमध्ये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात गेल्या पंधरा दिवसापासून चुरस कायम असून काँग्रेसने सांगलीच्या जागेवर हक्क सांगत आपली नाराजी कायम ठेवली आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानंतर आज आयेाजित करण्यात आलेल्या घटक पक्षाच्या बैठकीकडेही काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली.

आणखी वाचा-साताऱ्यात शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेचे शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल

या बैठकीत बोलताना पैलवान पाटील म्हणाले, मविआमधून चार वेळा माझी उमेदवारी जाहीर होउनही काँग्रेस अद्याप दूर आहे. उमेदवारीवरचा हक्क सोडण्यास राजी होत नाही.

काँग्रेसचे नेमके दुखणे काय हे कळत नाही. शेतकर्‍याचा मुलगा खासदार होतोय हे दुखणे आहे की, शिवसेनेचा खासदार होतोय हे दुखणे आहे हेच कळत नाही. काँग्रेसचे वागणे पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. त्यांनी पुढे येउन काय ते स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.