चिपळूण: बनावट नोटा छापून त्या बाजारात खपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिपळूणातील दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यानी दिलेल्या माहितीनूसार मुंबई गुन्हे शाखेच्या  पोलिसांनी मिरजोळी येथील एका दुकानावर धाड टाकून तेथून बेचाळीस हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. तसेच चिपळूणातील  एकाला आणि खेडमधील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एकूण  चौघांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये बनावट नोटा उपलब्ध होत असल्याची चर्चा होती. दोनशे व पाचशे रुपयांच्या या नोटा असून त्यातील काही नोटांचे रंग फिकट पडल्याचे प्रकारही काही नागरिकांना दिसून आले आहेत. आता चिपळूणमध्येच बनावट नोटा छापल्या जात असल्याचे समोर आल्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत मिरजोळी (ता. चिपळूण) येथील एका सर्विसिंग सेंटरच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या. बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्यासाठी शिरळ आणि पाचाड येथील दोघे तरूण काही दिवसापूर्वी मुंबईला गेले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या  पोलिसांना त्याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी पनवेल येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली. त्यानंतर  पोलीस चिपळूणात दाखल झाले. त्यांनी मिरजोळी येथील पत्र्याच्या दुकानावर धाड टाकली. तेथे त्यांना बेचाळीस हजार रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या. तसेच पनवेल येथे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी आणखी दोघांची नावे पोलिसांना दिली. त्यानूसार चिपळूणमधून एकाला आणि दुसऱ्याला खेडमधून उचलण्यात आले आहे. या दोघांना पोलिसांनी मुंबईला नेले आहे. या प्रकरणात आणखी कोण आहेत? नोटा कोणत्या मशीनने छापण्यात आल्या? ती मशीन कुठे आहे ? याबाबतची माहिती पोलीस या चौघांकडून घेणार आहे.