Ajit Pawar On Raigad DPDC Meeting : महायुतीच्या सरकामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले आग्रही आहेत, तर मंत्री आदिती तटकरे या देखील रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. यावरून शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात रस्सीखेच सुरु आहे. असं असतानाच आज रायगड जिल्हा नियोजन समितीची (DPDC) वार्षिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र, शिवसेनेचा (शिंदे) एकही आमदार बैठकीला उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आम्हाला बैठकीला बोलवलंच नव्हतं’, असं यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं. यावरून शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात धुसफूस सुरु असल्याच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, या चर्चानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. ‘रायगड जिल्हा नियोजन समितीची (DPDC) वार्षिक बैठक होती. मात्र, या बैठकीला कोणत्याही आमदारांना बोलावलंच नव्हतं. फक्क मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना बोलावलं होतं’, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.

अजित पवार काय म्हणाले?

“मी टिव्हीवर पाहिलं की रायगडच्या एकाही आमदाराला जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) वार्षिक बैठकीला बोलावलं नाही अशा चर्चा सुरु झाल्या. पण बैठकीला आमदारांना बोलावलंच नव्हतं. फक्त मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनाच बोलावलं होतं. या बैठकीला पालक सचिव असतात. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. मात्र, काही पाहायचं नाही आणि वेगवेगळ्या चर्चा सुरु करायच्या. ही बैठक वार्षिक आराखडा करण्याच्या संदर्भात होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका जिल्ह्याच्या स्थरावरही होत असतात”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

राष्ट्र्वादीच्या आमदारांची बैठक

“आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. सर्व म्हणजे ज्यांना-ज्यांना बैठकीला उपस्थित राहणं शक्य आहे त्या सर्वांची बैठक होणार आहे. या बैठकीत आमदारांच्या कामाचा आढावा घेता येतो. तसेच संघटनेच्या कामाच्या संदर्भात सूचना करता येतात. तसेच आमदारांच्याही काही अपेक्षा ऐकून घेता येतात, म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar on raigad dpdc meeting and shivsena shinde group mla mahayuti politics aditi tatkare vs bharat gogawale gkt