Premium

“रितेशजी राजकारणात यायचं असेल तर…”, पुढच्या वर्षी सत्तेत राहण्यावरून फडणवीसांचे खुमासदार भाष्य

“पुढच्यावर्षीही एकनाथ शिंदे आणि मीच सरकारमध्ये राहू. पण त्यासाठी रितेश देशमुख यांनी राजकारणाच्या बाहेर राहणे गरजेचे आहे. जर त्यांना राजकारणात यायचे असेल तर…”, असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis and Ritesh Deshmukh
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेते रितेश देशमुख यांना सांगितली राजकारणात येण्याची क्लृप्ती. (Photo – Loksatta Graphics Team)

“मराठी चित्रपटांचे बजेट कमी असले तरी त्याच्यातील सर्जनशीलता भारतातील इतर चित्रपटांपेक्षा कैकपटीने उत्कृष्ट आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे बजेट ऐकले की धडकी भरते. मराठीमध्ये बजेट कमी असले तरी मी दाव्याने सांगू शकतो की, जी सर्जनशीलता मराठी लोकांमध्ये त्यांच्या चित्रपट, मालिका आणि नाटकामध्ये आहे. ती इतर कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. विशेषतः मराठी रंगभूमीने या देशातील थिएटर जिवंत ठेवले आहे”, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेते रितेश देशमुख यांच्या राजकारणातील प्रवेशावर बोलत असताना फडणवीस यांनी त्यांना एक सूचना केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

फडणवीसांनी सांगितला राजकारणात येण्याचा मार्ग

‘आपला बायोस्कोप’ या पुरस्कार सोहळ्याद्वारे मराठी चित्रपटसृष्टी तसेच मराठी टेलिव्हिजन जगतातील नवोदित तसेच दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्यात येत आहे. हे पुरस्काराचे पहिलेच वर्ष आहे. “पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्याच वर्षी तुम्ही आम्हाला बोलावले आहे. पुढच्याही वर्षी आम्हालाच बोलवा. पुढच्या डिसेंबरमध्येही मुख्यमंत्री (शिंदे) आणि मीच राहणार आहे”, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अभिनेते रितेश देशमुख यांच्याकडे बोट दाखवत फडणवीस म्हणाले, “पुढच्यावर्षी आम्हाला या सोहळ्यात यायचे असेल तर रितेशजी तुम्ही राजकारणात यायचे नाही. ही पूर्वकल्पना आताच देतो आणि यायचे असेल तर कुठून यायचे, हे मी तुम्हाला सुचवतो.” देवेंद्र फडणवीस यांच्या या अनपेक्षित वक्तव्यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला.

एकनाथ शिंदे आधीच चित्रपटसृष्टीत

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आमचे मुख्यंमत्री या क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांनी धर्मवीर सिनेमाची निर्मिती केली. आता त्याचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. मीच एकटा असा आहे की, अद्याप कुठे काम केलेले नाही. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या श्रेया बुगडे यांच्याकडे पाहत म्हटले, “मला तुमच्या कार्यक्रमात घ्या”. याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मागे मी एका रिव्हर अँथममध्ये काम केले होते. त्यावर इतके मीम्स तयार झाले की, त्यानंतर मला वाटलं, मी हास्य कलाकार म्हणून काम करू शकतो.

अजित पवार कलाकार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सहकारी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करायला विसरले नाहीत. मला आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करत असताना अजितदादांनाही बोलवा. तेही एक कालाकार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त सुभेदार आणि वाळवी या दोन मराठी चित्रपटांचे फडणवीस यांनी कौतुक केले. दोन्ही सिनेमे वेगळ्या धाटणीचे असले तरी त्यांची मांडणी चांगली असल्याचे ते म्हणाले.

Live Updates

Web Title: Dcm devendra fadnavis give ideas to actor riteish deshmukh about joining politics kvg

First published on: 10-12-2023 at 12:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा