महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभा विरोधी पक्षनेते कोण होणार? याची चर्चा रंगली होती. अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षांत काँग्रेसचं संख्याबळ सर्वाधिक ठरलं. त्यानुसार काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री व वडेट्टीवारांच्याच विदर्भातले दुसरे मोठे नेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“वडेट्टीवारांना माईकची गरज नाही”

विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. “विजय वडेट्टीवारांचा माईक सुरू करा किंवा करू नका. त्यांना माईकची गरज नसते. त्यांचा आवाज कोणत्याही माईकपेक्षा मोठा आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी त्यांची स्पर्धा आहे. सुधीरभाऊही एक किलोमीटरवरून आल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे वडेट्टीवारांचा आवाज बुलंद आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एका निवडणुकीवेळी घडलेला प्रसंग सांगितला. “राणेंनी दुर्दैवानं शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना ज्यांनी साथ दिली, त्यातले विजय वडेट्टीवारही होते. तेव्हा एक कठीण पोटनिवडणूक होती. त्यात आम्ही सगळे विजय वडेट्टीवारांना पाडण्यासाठी गेलो होतो. कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. आम्हाला त्यांना पराभूत करायचं होतं. पण तेव्हाही मी पाहिलं की त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे त्या निवडणुकीतही ते निवडून आले. त्यानंतरही सातत्याने ते तिथून निवडून आले. २०१४ साली त्यांनी चिमूरऐवजी ब्रह्मपुरी मतदारसंघ निवडला. तिथे पहिल्यांदाच गेल्यानंतर त्यांनी तिथेही विजय मिळवला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आम्ही हात मिळवताना तुमचे चेहरे घाबरले होते, विजयभाऊंना…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; वडेट्टीवारांचा कला उल्लेख!

“२०१९मध्ये अनेकांनी अनेक विक्रम केले”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी वडेट्टीवारांचं अभिनंदन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कोपरखळी मारली. “२०१९ हे वेगळ्याच प्रकारचं वर्ष आहे. या वर्षात अनेक लोकांनी अनेक विक्रम केले आहेत. एक विक्रम तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा आहेच. त्यांनी ज्या प्रकारे सत्तापरिवर्तन केलं, मुख्यमंत्री म्हणून ते ज्या प्रकारे कारभार चालवताय ते पाहाता २०१९ चे हिरो तेच आहेत. पण त्याचसोबत २०१९ सालचे दुसरे हिरो आमचे अजितदादा आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

“होऊ घातलेले विरोधी पक्षनेते…”, देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख करताच सभागृहात पिकला हशा!

“२०१९ साली अजित पवार आधी माझ्याबरोबर उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले. आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याखालोखाल मी आहे. मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मग विरोधी पक्षनेता झालो. आता उपमुख्यमंत्री झालो”, असं फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला.

“आता काही बदल नाही”

“आता काही बदल नाहीये हां. आता लक्षात ठेवा. आता आम्ही तिघंही ज्या पदावर आहोत. त्याच पदांवर राहणार आहोत. अतिशय उत्तम काम करणार आहोत”, असं फडणवीसांनी म्हणताच समोरच्या बाकांवरून भास्कर जाधवांनी “मनापासून ना?” असा मिश्किल सवाल फडणवीसांना केला. त्यावर “१०० टक्के, आपलं मनापासूनच असतं. पाच वर्षं मुख्यमंत्रीपदी मी योग्य काम केलं आहे. त्यामुळे आता जी जबाबदारी मिळाली. त्यात मी अतिशय आनंदी आहे. काम करायला मजा येत आहे. चांगले सहकारी आहेत. त्यामुळे मला त्यात काहीही वावगं वाटत नाहीये”, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर सभागृहात पुन्हा हास्याची लकेर उमटली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis speech in vidhan sabha monsoon session on ajit pawar eknath shinde pmw